Maharashtra assembly Elections 2024 : केंद्रीय निवडणूक आयोगानं आज जम्मू-काश्मीर व हरयाणा विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. मात्र, महाराष्ट्र व झारखंड विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा केली नाही. त्याचं कारण मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिलं आहे.
महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ हरयाणा विधानसभेबरोबरच नोव्हेंबरमध्ये संपत आहे. त्यामुळं निवडणूक आयोग महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आज घोषित होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, तसं झालं नाही. याबाबत प्रश्न विचारला असता मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी यासाठी काही कारणं दिली.
मागील वेळेस महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आणि हरियाणा विधानसभा निवडणूक एकत्र झाली हे खरं आहे. मात्र, त्यावेळी जम्मू-काश्मीर हा घटक नव्हता. यावेळी एका वर्षी ४ निवडणुका आहेत आणि त्यानंतर लगेच पाचवी निवडणूक आहे. सुरक्षेच्या कारणास्तव आम्ही फक्त २ निवडणुका एकत्र घेण्याचा निर्णय घेतला आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून जम्मू-काश्मीरवर आम्हाला विशेष लक्ष द्यावं लागणार आहे. तिथं सुरक्षेची व मनुष्यबळाची जास्त गरज लागणार आहे. त्यामुळं सध्या फक्त जम्मू-काश्मीर आणि हरियाणाची निवडणूक होईल. त्यानंतर महाराष्ट्र, झारखंड आणि दिल्लीची निवडणूक होईल, असं राजीव कुमार म्हणाले.
महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक टाळण्याचं कारण देताना त्यांनी सण-उत्सवांकडं बोट दाखवलं. महाराष्ट्रात अलीकडं मुसळधार पाऊस झाला. त्यामुळं तिथं निवडणूक प्रक्रियेत अडथळा येऊ शकतो. शिवाय, राज्यात अनेक सणही आहेत. त्यात गणेशोत्सव आहे. पितृपक्ष आहे. त्यानंतर नवरात्रोत्सव, दिवाळी आहे. त्यामुळं देखील या निवडणुकीची घोषणा आम्ही टाळली आहे, असं राजीव कुमार म्हणाले.
निवडणूक आयोगानं आज केलेल्या घोषणेनुसार, जम्मू-काश्मीरमध्ये सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात तीन टप्प्यांत निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्याचं मतदान १८ सप्टेंबरला होईल. दुसऱ्या टप्प्याचं मतदान २५ सप्टेंबरला आणि शेवटच्या टप्प्याचं मतदान १ ऑक्टोबरला होईल. याच तारखेला हरयाणा विधानसभेसाठी मतदान होईल. हरयाणाचं मतदान एकाच टप्प्यात होणार आहे. दोन्ही निवडणुकांचा निकाल ४ ऑक्टोबरला जाहीर होईल, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली. नवी दिल्लीतील विज्ञान भवनात निवडणूक आयोगाची आजची पत्रकार परिषद झाली.
‘एक देश, एक निवडणूक’च्या बाता मारणाऱ्यांनी जम्मू-काश्मीरमधील सुरक्षेच्या नावाखाली महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक घेणं टाळलं आहे. जम्मू-काश्मीरमध्ये अजूनही परिस्थिती चिंताजनक असेल तर भाजपच्या राजवटीत तिथं नेमकं काय बदललं, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वरील पोस्टच्या माध्यमातून केला आहे. महाराष्ट्रातील निवडणूक टाळण्यासाठी दिलेल्या पावसाच्या कारणाचीही आदित्य ठाकरे यांनी खिल्ली उडवली आहे. पाऊस फक्त महाराष्ट्रात आहे, इतर राज्यात नाही का?, असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी केला आहे. एकेकाळी नावाजलेल्या या संस्थेची अवस्था किती लज्जास्पद झाली आहे, असा टोला त्यांनी सध्याच्या निवडणूक आयोगाला लगावला आहे.