who will be next delhi cm : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या निर्णयानंतर आता दिल्लीचे नवे मुख्यमंत्री म्हणून त्यांची जागा कोण घेणार याविषयी चर्चा व तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. केजरीवालांचे उत्तराधिकारी म्हणून आम आदमी पक्षातील अनेक ज्येष्ठ व अनुभवी नेत्यांची नावं चर्चेत आहेत.
आम आदमी पक्ष हा तुलनेनं नवा असला तरी या पक्षात अनेक उच्चशिक्षित व सामाजिक कार्याचा अनुभव असलेले नेते आहेत. त्यामुळं साहजिकच केजरीवालांचे उत्तराधिकारी म्हणून अनेक नावं सध्या चर्चेत आहेत. यात केजरीवाल व मनीष सिसोदिया यांच्या अनुपस्थितीत दिल्ली सरकारचा कारभार पाहणाऱ्या मंत्री आतिशी यांच्यासह सौरभ भारद्वाज, कैलास गहलोत, गोपाल राय आणि इम्रान हुसेन या विद्यमान आमदारांचा समावेश आहे.
अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांचीही या पदावर वर्णी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी एखाद्या दलित नेत्याची नियुक्ती केली जाऊ शकते, अशीही चर्चा आहे. अर्थात, तसं कोणतंही नाव अद्याप पुढं आलेलं नाही. सध्या तरी शिक्षण, अर्थ, महसूल, कायदा अशी अनेक महत्त्वाची खाती आतिशी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. स्वातंत्र्यदिनी तिरंगा फडकवण्यासाठी केजरीवाल यांनी आतिशी यांची निवड केली होती. मात्र, नायब राज्यपालांनी त्यास परवानगी दिली नव्हती. मात्र, आतिशी यांच्यावर केजरीवाल यांचा विश्वास असल्याचं यातून स्पष्ट झालं आहे.
माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याकडं मुख्यमंत्रिपदाची सूत्रं देण्याची शक्यता पक्ष नेतृत्वानं फेटाळून लावली आहे. विधानसभेच्या निवडणुका होईपर्यंत पक्षातीलच कोणीतरी हे पद भूषवेल, असं केजरीवाल यांनी स्पष्ट केलं आहे.
दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ कधी संपणार?
दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ ११ फेब्रुवारी २०२५ रोजी संपुष्टात येत आहे. दिल्लीत याआधी ८ फेब्रुवारी २०२० रोजी विधानसभा निवडणूक झाली होती. त्यावेळी ७० सदस्यांच्या विधानसभेत आम आदमी पक्षाला ६२ तर भारतीय जनता पक्षाला ८ जागा मिळाल्या होत्या.
माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनीही आपण तूर्त कोणतंही पद स्वीकारणार नसल्याचं म्हटलं आहे. मी केजरीवाल यांच्यासोबत प्रचार करणार असून जनतेकडून क्लीन चिट मिळेपर्यंत कोणतंही अधिकृत पद स्वीकारणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. अरविंद केजरीवाल यांनी १६ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.