लेबनॉनची राजधानी बैरूतमध्ये इस्रायलने केलेल्या हल्ल्यात हिजबुल्लाहचा म्होरक्या नसरल्लाह ठार झाला आहे. इस्रायलच्या लष्कराने शनिवारी हा दावा केला आहे. शुक्रवारी रात्री इस्रायलने बैरूतमधील अनेक इमारतींवर हवाई हल्ले करत नसरल्लाहला लक्ष्य केले. या हल्ल्यात केवळ नसरल्लाच नव्हे तर त्यांची मुलगी जैनब नसरल्लाह यांचाही मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. इस्रायलने नसरल्लाहच्या मृत्यू झाल्याचा दावा केला असला तरी अद्याप मुलीबाबत अपडेट दिली नाही.
इस्रायली लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल नादव शोशानी यांनी 'एक्स'वर घोषणा केली की, हसन नसरल्लाह यांचा मृत्यू झाला आहे. लष्कराचे प्रवक्ते कॅप्टन डेव्हिड अवराम्स यांनीही लेबनॉनच्या राजधानीवर शुक्रवारी झालेल्या हल्ल्यानंतर हिजबुल्लाहच्या प्रमुखाचा खात्मा करण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. इराणसमर्थित गटाच्या एका जवळच्या सूत्राने नाव न छापण्याच्या अटीवर एएफपीला सांगितले की, नसरल्लाह यांच्याशी शुक्रवारी सायंकाळपासून संपर्क तुटला होता. नसरल्लाहच्या मृत्यूनंतर आता हिजबुल्लाहची कमान कुणाकडे सोपवली जाणार, हा सर्वात मोठा प्रश्न आहे.
या हल्ल्यात नसरल्लाह व्यतिरिक्त हिजबुल्लाहचे इतर अनेक कमांडर मारले गेले आहेत. या हल्ल्यात हिजबुल्लाहच्या दक्षिण आघाडीचा कमांडर म्हणून ओळखला जाणारा अली कराके आणि हिजबुल्लाहचे इतर अनेक कमांडर ठार झाल्याची माहिती इस्रायली लष्कराने दिली आहे. नसरल्लाह यांच्यासह त्यांच्या अनेक जवळच्या मित्रांची जमवाजमव झाल्यानंतर आता पुढील प्रमुखाबाबत कयास बांधले जात आहेत. हाशेम सफीद्दीन हे सध्या नसरल्लाह यांचे उत्तराधिकारी मानले जातात. तो हिजबुल्लाहच्या राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवतो आणि नसरल्लाहचा चुलत भाऊ आहे. अमेरिकेने २०१७ मध्ये सफिद्दीनला दहशतवादी घोषित केले होते. तो हिजबुल्लाहचा पुढचा प्रमुख असू शकतो, कारण प्र्मुखपदी अशी व्यक्ती येऊ शकते, जी केवळ हिजबुल्लाच चालवू शकत नाही तर इराणलाही मान्य आहे.
सफिद्दीनचे इराणशी चांगले संबंध आहेत. इराणमधील कुद्स फोर्सचे माजी कमांडर सुलेमानी यांची मुलगी जैनब सुलेमानी हिच्याशी त्यांचा मुलगा रिदाचा विवाह झाला आहे. १९६४ मध्ये जन्मलेले सफीद्दीन इराणच्या मौलवींशी चांगले संबंध ठेवण्यासाठी ही ओळखले जातात. याशिवाय हिजबुल्लाहच्या राजकीय आणि आर्थिक कारवायांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असून त्यांना नसरल्लाहचे उत्तराधिकारी मानले जाते. संघटनेतील विविध पदांच्या माध्यमातून नसरल्ला बराच काळ सफिद्दीनला नेतृत्वासाठी तयार करत होता. त्यामुळेच आता नसरल्लाह मारला गेल्याचा दावा केला जात असल्याने त्याचा उत्तराधिकारी सफीद्दीन मानला जात आहे.
हिजबुल्लाहचे नसरल्लाह यांच्या मृत्यूनंतर इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. खामेनी यांनी म्हटले की, गाझा युद्धापासून इस्रायलने कुठलाही धडा घेतलेला नाही. हिजबुल्लाच्या तुलनेत इस्रायल फार छोटा आहे. आम्ही लेबनॉनच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांना कडेकोट बंदोबस्तात सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे.