India withdraws High Commissioner from Canada: कॅनडामध्ये सुरू असलेल्या गुन्हेगारी कारवायांच्या तपासात अनेक भारतीय अधिकाऱ्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. यात भारतीय उच्चायुक्त संजय कुमार वर्मा यांच्याही नावाचा समावेश आहे. मात्र, यावर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र आक्षेप घेतला. तसेच कॅनडाला प्रत्युत्तर देण्याचे म्हटले आहे. सध्या भारत आणि कॅनडा या दोन्ही देशांनी सहा मुत्सद्दींची हकालपट्टी केली असून देश सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत.
खलिस्तानी अतिरेकी हरदीप सिंह निज्जर यांच्या हत्येच्या तपासाशी संबंधित आरोप फेटाळून लावत भारताने कॅनडाच्या सहा मुत्सद्दींची हकालपट्टी केली आणि आपले उच्चायुक्त आणि इतर अधिकाऱ्यांना माघारी बोलावण्याची सोमवारी घोषणा केली. या निर्णयामुळे दोन्ही देशांमधील आधीच ताणलेल्या संबंधांमध्ये लक्षणीय बिघाड झाला आहे.
संजय कुमार वर्मा यांचा जन्म २८ जुलै १९६५ रोजी बिहारमधील पाटणा येथे झाला. येथून पदवी घेतल्यानंतर ते भौतिकशास्त्रातील पदव्युत्तर पदवीसाठी दिल्ली आयआयटी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये गेले. गुंजन वर्मा यांच्याशी त्यांचा विवाह झाला असून त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. भारत सरकारच्या अधिकृत वेबसाइटनुसार, वर्मा यांना आयटी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर डिप्लोमसीमध्ये प्रचंड रस आहे.
संजय वर्मा हे १९८८ मध्ये भारतीय परराष्ट्र सेवेत रुजू झाले. हाँगकाँग, चीन, व्हिएतनाम, तुर्किये, मिलान (इटली) येथेही त्यांनी सेवा बजावली आहे. त्यांनी सुदानमधील भारताचे राजदूत म्हणून काम पाहिले. सुदाननंतर ते परराष्ट्र मंत्रालयात संयुक्त सचिव आणि नंतर अतिरिक्त सचिवही झाले. कॅनडात जाण्यापूर्वी ते जपान आणि मार्शल बेटांवर भारताचे राजदूत म्हणून कार्यरत होते.
संजय वर्मा यांच्यावरील आरोप 'बनावट' आणि 'बेतुकी' असून ते ट्रुडो सरकारच्या राजकीय अजेंडाशी संबंधित आहेत, जे व्होट बँकेच्या राजकारणावर केंद्रित आहेत, असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
भारतीय उच्चायुक्त आणि इतर मुत्सद्दी कॅनडातील एका प्रकरणाच्या तपासावर लक्ष ठेवून आहेत, अशी माहिती कॅनडाकडून भारताला काल मिळाली, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. सध्याच्या कॅनडा सरकारच्या सुरक्षेबाबतच्या बांधिलकीवर आमचा विश्वास नाही. त्यामुळे भारत सरकारने उच्चायुक्त आणि इतर मुत्सद्दी आणि अधिकाऱ्यांना परत बोलवण्याचा निर्णय घेतला आहे. '
संबंधित बातम्या