Who is Sajjan Kumar : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर १९८४ मध्ये दिल्लीत उसळलेल्या शीख विरोधी दंगलीतील दुहेरी हत्याकांडाच्या प्रकरणात काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांना दिल्ली कोर्टानं दोषी ठरवलं आहे. बचाव पक्ष आणि सरकारी पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालय १८ फेब्रुवारी रोजी शिक्षेची घोषणा करणार आहे.
न्यायालयाच्या या निर्णयामुळं पुन्हा एकदा १९८४ च्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. हत्याकांडात दोषी ठरलेले सज्जन कुमार नेमके आहेत कोण? दंगलीत त्यांची काय भूमिका होती? सध्या ते कुठं आहेत? जाणून घेऊया या प्रश्नांची उत्तरं…
सज्जन कुमार हे काँग्रेसचे माजी खासदार आहेत. ते काँग्रेसतर्फे लोकसभेत तीन वेळा निवडून गेले होते. दिल्ली मतदारसंघाचं प्रतिनिधित्व त्यांनी केलं होतं. डिसेंबर २०१८ मध्ये झालेल्या दंगलीशी संबंधित एका प्रकरणात दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. सध्या ते दिल्ली कँटमधील नरसंहाराशी संबंधित एका प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.
१ नोव्हेंबर १९८४ रोजी जसवंतसिंग आणि त्यांचा मुलगा तरुणदीप सिंग यांच्या हत्येशी संबंधित खटला सज्जन कुमार यांच्या विरोधात सुरू होता. अंतिम युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं निकाल राखून ठेवला होता.
जसवंत सिंह यांच्या पत्नीनं त्यांचा पती आणि मुलाची हत्या केल्याप्रकरणी कुमार यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी काँग्रेस खासदारानं मोठ्या प्रमाणात लूटमार, जाळपोळ आणि त्यांच्या घराची मालमत्ता उद्ध्वस्त केल्याचा आरोप सरकार पक्षानं केला होता.
पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीजच्या (PUCL) सत्यशोधन अहवालानुसार, दिल्लीतील दंगल ही इंदिरा गांधी यांच्या हत्येची उत्स्फूर्त प्रतिक्रिया नव्हती. काँग्रेस नेत्यांनी जाणीवपूर्वक केलेला तो हल्ला होता. सज्जन कुमार हे या हल्ल्याचे मास्टरमाइंड होते, असा आरोप दंगलीतील पीडितांनी केला होता. त्यावेळी सज्जन कुमार यांनी प्रत्येक हल्लेखोराला १०० रुपये आणि दारूची बाटली दिल्याचा आरोप केला होता. दंगलीनंतर शीख निर्वासितांच्या छावण्यांमधील पीडितांनी कुमार यांनी दिलेली मदत नाकारली आणि ते हिंसाचारामागील मुख्य सूत्रधार असल्याचं म्हटलं होतं.
पालम कॉलनीतील राजनगर पार्ट-१ भागात पाच शीखांची हत्या केल्याप्रकरणी आणि राजनगर पार्ट-२ मधील गुरुद्वारा जाळल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयानं त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. कुमार यांनी या शिक्षेविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील केलं आहे.
कनिष्ठ न्यायालयानं त्यांची निर्दोष मुक्तता केल्याच्या विरोधात आणखी दोन याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. नवादामधील गुलाब बाग येथील गुरुद्वाराजवळ झालेल्या हिंसाचाराशी संबंधित आणखी दोन खटले दिल्लीच्या कनिष्ठ न्यायालयात प्रलंबित आहेत. तसंच, जनकपुरी आणि विकासपुरी भागातील दंगलीशी संबंधित एका प्रकरणातही खटला सुरू आहे.
दिल्ली शीख गुरुद्वारा मॅनेजमेंट कमिटीचे सरचिटणीस जगदीप सिंग काहलो यांनी या शिक्षेचं स्वागत केलं आहे. ४० वर्षांपूर्वी शीख हत्याकांडाचं नेतृत्व करणारे सज्जन कुमार यांना दोषी ठरवण्यात आलं असून त्यांना शिक्षा झाली पाहिजे. त्याबद्दल मी न्यायालयाचे आभार मानतो. सत्तेत आल्यानंतर एसआयटी स्थापन केल्याबद्दल मी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानतो. बंद प्रकरणांची फेरचौकशी करण्याचा हा परिणाम आहे. जगदीश टायटलर प्रकरणातही आम्हाला न्याय मिळेल, असा विश्वास जगदीप सिंह काहलो यांनी व्यक्त केला.
संबंधित बातम्या