युनोमध्ये ८ वर्षे नोकरी, निवडणूक रणनीतीकार आणि आता स्वत:चा पक्ष… कोण आहेत प्रशांत किशोर?-who is prashant kishor political strategist to start new inning in bihar to launch new party today ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  युनोमध्ये ८ वर्षे नोकरी, निवडणूक रणनीतीकार आणि आता स्वत:चा पक्ष… कोण आहेत प्रशांत किशोर?

युनोमध्ये ८ वर्षे नोकरी, निवडणूक रणनीतीकार आणि आता स्वत:चा पक्ष… कोण आहेत प्रशांत किशोर?

Oct 02, 2024 03:04 PM IST

Prashant Kishor : देशातील आठ पक्ष व त्यांच्या नेत्यांसोबत काम करण्याचा अनुभव असलेले निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर आज स्वत:च्या नव्या पक्षाची घोषणा करणार आहेत.

युनोमध्ये ८ वर्षे नोकरी, निवडणूक रणनीतीकार आणि आता स्वत:चा पक्ष… कोण आहेत प्रशांत किशोर?
युनोमध्ये ८ वर्षे नोकरी, निवडणूक रणनीतीकार आणि आता स्वत:चा पक्ष… कोण आहेत प्रशांत किशोर?

बिहारच्या राजकारणाला आजपासून नवी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. निवडणूक रणनीतीकार म्हणून देशात प्रसिद्ध असलेले प्रशांत किशोर ऊर्फ पीके आज नव्या राजकीय पक्षाची औपचारिक घोषणा करणार आहेत. अनेक नेत्यांना सत्तेपर्यंत पोहोचण्यात मदत करणारे प्रशांत किशोर स्वत:च्या पक्षाला कितपत यश मिळवून देतात याविषयी उत्सुकता आहे.

प्रशांत किशोर यांच्या नव्या इनिंगच्या पार्श्वभूमीवर त्यांचा आतापर्यंतचा प्रवास जाणून घेणं आवश्यक आहे. कोण आहेत प्रशांत किशोर? कशामुळं ते प्रसिद्धी झाले? त्याआधी ते नेमकं काय करत होते? जाणून घेऊया…

प्रशांत किशोर यांचा जन्म २० मार्च १९७७ रोजी बिहारमधील रोहतास जिल्ह्यातील कोनार गावात झाला. त्यांचे वडील श्रीकांत पांडे हे सरकारी डॉक्टर होते. प्रशांत यांच्या जन्मानंतर त्यांचं कुटुंब बक्सरला स्थलांतरित झालं. तिथंच पीके यांचं शिक्षण झालं. सुरुवातीचं शिक्षण बक्सरमधून घेतल्यानंतर पीके इंजिनीअरिंगच्या शिक्षणासाठी हैदराबादला गेले. इंजिनीअरिंग केल्यानंतर त्यांना युनोच्या (United Nations) आरोग्य विषयक उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली.

आठ वर्षे संयुक्त राष्ट्रसंघात नोकरी

प्रशांत किशोर यांनी सुमारे आठ वर्षे यूएनमध्ये काम केलं. त्यांची पहिली पोस्टिंग संयुक्त आंध्र प्रदेशातील हैद्राबादमध्ये झाली होती. आंध्रनंतर पोलिओ निर्मूलन कार्यक्रमासाठी त्यांना बिहारमध्ये पाठवण्यात आलं. त्यावेळी बिहारमध्ये राबडी देवी यांच्या नेतृत्वाखाली आरजेडीचं सरकार होतं. आंध्र प्रदेश आणि बिहारमध्ये व्यावसायिक अनुभव घेतल्यानंतर ते अमेरिकेत गेले. तिथं युनोच्या मुख्यालयात त्यांना ड्युटी लागली. मात्र, त्यांचं मन तिथं रमलं नाही. त्यांना चाड इथं विभाग प्रमुख म्हणून पाठवण्यात आलं. तिथं त्यांनी सुमारे चार वर्षे काम केलं.

निवडणूक रणनीतीकार म्हणून प्रवास

युनायटेड नेशन्समध्ये आरोग्य तज्ञ म्हणून जवळपास आठ वर्षे काम केल्यानंतर पीके यांनी २०११ मध्ये निवडणूक रणनीतीकार म्हणून नवीन प्रवास सुरू केला. ते गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या टीममध्ये सहभागी झाले. सीएम मोदी ते पीएम मोदी या प्रवासात त्यांच्या रणनीतीचा मोठा वाटा होता असं मानलं जातं. भारतीय राजकारणातील ब्रँडिंगच्या युगाची ही सुरुवात मानली जाते. पीके यांनी २०१३ मध्ये भारतीय राजकीय कृती समिती म्हणजेच I-PAC ची स्थापना केली आणि २०१४ मध्ये सिटिझन्स फॉर अकाउंटेबल गव्हर्नन्स (CAG) ची स्थापना केली.

२०१४ मध्ये भाजपच्या विजयामुळं देशभरात नाव

२०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच्या मोठ्या विजयामुळं पीके यांना ओळख मिळाली. त्यांनी भाजपच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी निवडणूक रणनीती आखली होती. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर पीकेबद्दल बरीच चर्चा झाली. भाजप व्यतिरिक्त प्रशांत किशोर यांनी जेडीयू-आरजेडी युतीपासून काँग्रेसपर्यंत वेगवेगळ्या राजकीय पक्षांसोबत काम केलं. २०१५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत त्यांनी आरजेडी-जेडीयू-काँग्रेसच्या महाआघाडीसाठी निवडणूक रणनीतीकाराची भूमिका बजावली आणि त्यांना विजयी होण्यास मदत केली.

आठ पक्षांसोबत रणनीतीकार म्हणून काम

पीके यांनी २०१७ च्या पंजाब विधानसभा निवडणुकीत कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यासाठी काम केलं. काँग्रेसनं तिथं विजय मिळवून सरकारही स्थापन केलं. पीके यांनी २०१९ च्या आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत वायएसआर काँग्रेस पक्षासाठी रणनीती तयार केली. तिथंही त्यांच्या रणनीतीला यश आलं. २०२१ च्या पश्चिम बंगाल निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस (TMC) च्या विजयाचे शिल्पकार देखील त्यांना मानलं जातं.

प्रशांत किशोर यांनी २०२० च्या दिल्ली निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षासाठी आणि २०२१ च्या तामिळनाडू निवडणुकीत एमके स्टॅलिन यांच्या पक्ष DMK साठी निवडणूक रणनीतीकार म्हणून काम केलं. एकूण ८ पक्षांंसाठी त्यांनी काम केलं आहे.

जेडीयूमधून राजकीय पदार्पण

नितीश कुमार यांचा पक्ष जेडीयूसोबत त्यांनी सक्रिय राजकारणात पदार्पण केलं. ते १६ सप्टेंबर २०१८ रोजी जेडीयूमध्ये सामील झाले आणि ऑक्टोबर महिन्यात पक्षानं त्यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष बनवलं. नितीश यांचे उत्तराधिकारी म्हणूनही त्यांच्या नावाची चर्चा होती, पण २०२० च्या सुरुवातीला चित्र बदललं. २९ जानेवारी २०२० रोजी जेडीयूने पीके यांची पक्षातून हकालपट्टी केली. जेडीयूमधून हकालपट्टी झाल्यानंतर प्रशांत किशोर यांनी नागिरकांच्या राजकीय प्रबोधनासाठी जन सुराज अभियान सुरू केलं. त्यांनी २ ऑक्टोबर २०२२ रोजी गांधी आश्रम भिटारिहवा येथून जन सुराज पदयात्रा सुरू केली होती. त्यानंतर आज ते नव्या पक्षाची औपचारिक घोषणा करणार आहेत.

Whats_app_banner
विभाग