Prajwal Revanna : सेक्स स्कँडलमुळं वादात अडकलेले प्रज्वल रेवण्णा नेमके आहेत कोण? किती आहे त्यांची संपत्ती?
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Prajwal Revanna : सेक्स स्कँडलमुळं वादात अडकलेले प्रज्वल रेवण्णा नेमके आहेत कोण? किती आहे त्यांची संपत्ती?

Prajwal Revanna : सेक्स स्कँडलमुळं वादात अडकलेले प्रज्वल रेवण्णा नेमके आहेत कोण? किती आहे त्यांची संपत्ती?

Apr 29, 2024 05:18 PM IST

Prajwal Revanna Hassan Sex Tape : सेक्स स्कँडलमध्ये अडकलेले भाजप-जेडीएस युतीचे हासन लोकसभा मतदारसंघातील उमेदवार प्रज्वल रेवण्णा नेमके आहेत कोण?

Prajwal Revanna sex scandal case: Assets, education, other details. 5 points
Prajwal Revanna sex scandal case: Assets, education, other details. 5 points

Who is Prajwal Revanna : कर्नाटकातील हासन सेक्स स्कँडलमुळं सध्या देशभरात खळबळ उडाली आहे. कर्नाटक सरकारनं या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन केलं आहे. या प्रकरणात अडकलेले प्रज्वल रेवण्णा हे देश सोडून पळाल्याची चर्चा आहे. ते भाजप-जेडीएस युतीचे उमेदवार असल्यामुळं जेडीएसबरोबर भाजपही अडचणीत आला आहे.

काय आहेत आरोप?

हासनचे विद्यमान खासदार व लोकसभा निवडणुकीतील उमेदवार प्रज्वल रेवन्ना यांच्यावर कथित सेक्स स्कँडलमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे. इतकंच नव्हे, प्रज्वल आणि त्यांचे वडील रेवन्ना यांच्याविरोधात त्यांच्या घरातील मदतनीसांनी देखील २०१९ ते २०२२ या काळात अनेकवेळा लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखाली एफआयआर देखील दाखल केला होता.

एचडी रेवन्ना आणि प्रज्वल रेवन्ना त्यांच्या घरातील महिला कामगारांचं लैंगिक शोषण करायचे. रेवण्णा यांची पत्नी घरी नसली की ते कर्मचारी महिलांना स्टोअररूममध्ये बोलवायचे आणि त्यांना स्पर्श करायचे. महिलांवर लैंगिक अत्याचार करायचे.

या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम ३५४ अ (लैंगिक छळ), ३५४ ड (पाठलाग), ५०६ (गुन्हेगारी धमकी) आणि ५०९ (महिलेचा विनयभंग) यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. आरोपांची चौकशी करण्याचं काम आता एसआयटीकडं देण्यात आलं आहे.

कोण आहेत प्रज्वल रेवण्णा?

प्रज्वल रेवण्णा हे हासन लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. तसंच, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत जेडीएस-भाजप युतीचे उमेदवार आहेत. २६ एप्रिल रोजी त्यांचं भवितव्य मतपेटीत बंद झालं आहे.

प्रज्वल रेवण्णा हे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे नातू आहे. देवेगौडा यांचे एक चिरंजीव एचडी रेवन्ना यांचे ते पुत्र आहेत. बेंगळुरू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून इंजिनीअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यानंतर ते ऑस्ट्रेलियामध्ये मार्स्टर्स करण्यासाठी गेले होते, मात्र शिक्षण अर्धवट सोडून ते भारतात परतले.

२०१९ मध्ये ते पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले होते. त्यावेळी ते राज्यातील सर्वात तरुण खासदारांपैकी एक होते. उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, प्रज्वल रेवन्ना हे ४० कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत. त्यांच्या नावावर कार किंवा कोणतीही निवासी इमारत नाही. प्रज्वल यांच्याकडं १ लाख ४ हजार रुपये किमतीचं पिस्तूल आणि २ लाख ६८ हजार रुपये किमतीची रायफल असल्याचंही प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलं आहे.

याआधीही झाला होता आरोप

प्रज्वल रेवण्णा हे वादात अडकण्याची ही पहिली वेळ नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत चुकीचं आणि खोटं प्रतिज्ञापत्र दाखल केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. कर्नाटक उच्च न्यायालयानं त्यांच्याविरोधात समन्सही बजावलं होतं.

काँग्रेसनं भाजपला घेरलं!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका जाहीर सभेत रेवण्णा यांच्यासाठी मतं मागितली होती. त्यावरून आता काँग्रेसनं मोदी आणि भाजपला घेरलं आहे. कशाच्या आधारे भाजपनं रेवण्णा यांना पाठिंबा दिला? महिलांवर अत्याचार करणाऱ्यांच्या मागेच भाजप का उभा राहतो? याचं उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्यायला हवं, असा घणाघात काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी केला. महिला बालविकास मंत्री स्मृती ईराणी महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर मूग गिळून का बसतात?,' असा सवालही सुप्रिया श्रीनेत यांनी केला.

Whats_app_banner
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर