Nitasha kaul : भारतात प्रवेश नाकारण्यात आलेल्या निताशा कौल आहेत कोण? बेंगळुरू एअरपोर्टवर काय घडलं?-who is nitasha kaul indian origin uk based professor denied into india ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Nitasha kaul : भारतात प्रवेश नाकारण्यात आलेल्या निताशा कौल आहेत कोण? बेंगळुरू एअरपोर्टवर काय घडलं?

Nitasha kaul : भारतात प्रवेश नाकारण्यात आलेल्या निताशा कौल आहेत कोण? बेंगळुरू एअरपोर्टवर काय घडलं?

Feb 26, 2024 10:59 AM IST

Nitasha Kaul Controversy : भारतीय वंशाच्या लंडनमधील लेखिका प्राध्यापिका निताशा कौल यांना भारतात प्रवेश नाकारण्यात आला आहे. बेंगळुरू विमानतळावरून त्यांना परत पाठवण्यात आलं आहे. कोण आहेत निताशा कौल?

Who is Nitasha Kaul?
Who is Nitasha Kaul?

Who is Nitasha Kaul : भारतीय वंशाच्या लंडनस्थित प्राध्यापिका निताशा कौल यांना भारतात प्रवेश नाकारण्यात आल्याचं वृत्त आहे. खुद्द कौल यांनीच सोशल मीडियावर पोस्ट लिहून तसा दावा केला आहे. दिल्लीच्या आदेश असल्याचं सांगून मला बेंगळुरू विमानतळावरून लंडनला परत पाठवण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

निताशा कौल या 'संविधान आणि राष्ट्रीय एकता अधिवेशन २०२४' मध्ये वक्त्या म्हणून सहभागी होण्यासाठी आल्या होत्या. कर्नाटक सरकारनं त्यांना आमंत्रित केलं होतं. मात्र, बेंगळुरूत उतरल्यानंतर त्यांना प्रवेश नसल्याचं सांगण्यात आल्याचं समोर आलं आहे. 'लोकशाही आणि संवैधानिक मूल्यांबाबतच्या त्यांच्या भूमिकेमुळं त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. आरएसएसवर यापूर्वी केलेल्या टीकेचा संदर्भ विमानतळ अधिकाऱ्यांनी प्रवेश नाकारताना दिला, असं निताशा यांनी म्हटलं आहे.

निताशा म्हणतात…

माझ्या प्रवासाची आणि सामानाची सर्व व्यवस्था कर्नाटक सरकारनं केली होती. माझ्याकडं सरकारच्या आमंत्रणाचं अधिकृत पत्रही होतं. मात्र, बेंगळुरू विमानतळावर उतरल्यावर मला प्रवेश नाकारण्यात आल्याचं कळलं. ‘आम्ही काही करू शकत नाही, दिल्लीचे आदेश आहेत, असं इमिग्रेशन विभागाच्या सांगितल्याचं निताशा यांनी 'एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.

'लंडन ते बंगलोर फ्लाइटमध्ये मी १२ तास घालवले, इमिग्रेशनमध्ये अनेक तास त्यांनी मला इकडं-तिकडं फिरवलं. प्रक्रियेबद्दल कोणतीही माहिती दिली नाही. त्यानंतर एका रूममध्ये सीसीटीव्हीच्या निरीक्षणाखाली मी २४ तास घालवले. खाण्या-पिण्याची, नीट झोपण्याची व्यवस्था तिथं नव्हती. मी विमानतळ अधिकाऱ्यांना डझनभर कॉल केले व साध्या गोष्टींची मागणी केली. पण त्यांनी ते देण्यास नकार दिला. शेवटी पुन्हा १२ तास फ्लाइटमध्ये घालवून लंडनला परतले.

कोण आहेत निताशा कौल?

निताशा कौल या लंडनमधील वेस्टमिन्स्टर विद्यापीठात राजकारण, आंतरराष्ट्रीय संबंध आणि आंतरविद्याशाखीय विषयाच्या प्राध्यापक आहेत.

कौल यांनी एसआरसीसी, दिल्ली विद्यापीठातून अर्थशास्त्रात बीए ऑनर्स आणि सार्वजनिक धोरण या विषयासह अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. युनिव्हर्सिटी ऑफ हल, यूके (२००३) मधून त्यांनी अर्थशास्त्र आणि तत्वज्ञान विषयात संयुक्त पीएच.डी. केली आहे.

२००२ ते २००७ पर्यंत त्यांनी ब्रिस्टल बिझनेस स्कूलमध्ये अर्थशास्त्राच्या सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केलं. २०१० मध्ये त्यांनी भूतानमधील रॉयल थिम्पू कॉलेजमध्ये सर्जनशील लेखनात सहयोगी प्राध्यापक म्हणून काम केलं.

कौल या कादंबरीकार, लेखक आणि कवी देखील आहेत. त्यांनी 'इमॅजिनिंग इकॉनॉमिक्स अदरवाइज: एन्काउंटर्स विथ आयडेंटिटी/डिफरन्स' हे अर्थशास्त्र आणि तत्त्वज्ञानावरील अभ्यासपूर्ण पुस्तक लिहिलंय.

२०१८ मध्ये ‘महिला आणि काश्मीर’ या विषयावरील विशेष आर्थिक आणि राजकीय साप्ताहिकाचं (EPW) सहसंपादन त्यांनी केलं होतं. 'तुम्ही काश्मिरी महिलांचा आवाज ऐकू शकता का? नॅरेटिव्हज ऑफ रेझिस्टन्स अँड रेझिलिअन्स' (वुमन अनलिमिटेड, २०२०) या विशेषांकाचंही सहसंपादन केलं आहे. २०१९ मध्ये जम्मू-काश्मीरची स्वायत्तता रद्द झाल्यानंतर त्यांनी 'काश्मीर आणि मानवी हक्क' या विषयावर यूएस काँग्रेसला तज्ज्ञ म्हणून मार्गदर्शनही केलं आहे.

Whats_app_banner