who is awadhesh Prasad : उत्तर प्रदेशातील लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा मोठा पराभव झाला आहे. विशेष म्हणजे ज्या राम मंदिराच्या नावावर भाजपनं आजवर राजकारण केलं, त्या रामजन्मभूमी अयोध्येची जागाही भाजपला वाचवता आली नाही. समाजवादी पक्षाचे नेते अवधेश प्रसाद सिंह यांनी ही जागा भाजपकडून खेचून घेतली. हा निकाल आल्यापासून अवधेश प्रसाद यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.
दलित समाजातून आलेले अवधेश प्रसाद सिंह यांनी बिगर राखीव मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. तसं करणारे ते एकमेव नेते आहेत. त्यांनी केवळ निवडणूक लढलीच नाही, तर जिंकूनही दाखवली. अवधेश प्रसाद यांनी भाजपचे दोन वेळचे खासदार लल्लू सिंह यांचा ५४५६७ मतांनी पराभव केला.
अवधेश प्रसाद हे समाजवादी पक्षाचा दलित चेहरा म्हणून ओळखले जातात. मात्र, त्यांना स्वत:ची अशी संकुचित ओळख करून देणं आवडत नाही. अवधेश प्रसाद हे याआधी सात वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. ते पहिल्यांदाच खासदार झाले आहेत.
अवधेश प्रसाद यांनी लखनौ विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. वयाच्या अवघ्या २१व्या वर्षापासून ते राजकारणात सक्रिय आहेत. माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रांती दलातही ते होते. १९७४ मध्ये त्यांनी अयोध्या जिल्ह्यातील सोहवल मतदारसंघातून पहिली विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही.
आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगला होता. तुरुंगात असतानाच त्यांच्या आईचं निधन झालं. मात्र, आईच्या अंत्यसंस्कारासाठीही त्यांना पॅरोल देण्यात आलेला नाही. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी शिक्षण अर्धवट सोडून पूर्णवेळ राजकारण सुरू केलं. १९८१ मध्ये ते लोकदल आणि जनता पार्टी दोन्हीचे सरचिटणीस बनले.
अवधेश प्रसाद वडिलांच्या अंत्यसंस्कारालाही उपस्थित राहू शकले नाहीत. राजीव गांधी यांनी त्यांच्या पहिल्या निवडणुकीत लोकदलाचे शरद यादव यांचा पराभव केला होता. चरणसिंग यांच्याकडून अवधेश प्रसाद यांना मतमोजणी कक्षाबाहेर न पडण्याच्या सूचना मिळाल्या होत्या. सात दिवस मतमोजणी सुरू होती. त्याच दरम्यान त्यांच्या वडिलांच्या निधनाची बातमी आली. मात्र, त्यांनी मतमोजणी केंद्र सोडलं नाही.
जनता पक्षात फूट पडल्यानंतर अवधेश प्रसाद हे मुलायम सिंह यांच्यासोबत राहिले. १९९२ मध्ये त्यांनी मुलायम यांच्यासोबत मिळून समाजवादी पक्षाची स्थापना केली. त्यांची पक्षाचे राष्ट्रीय सचिव आणि केंद्रीय संसदीय मंडळाचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. नंतर त्यांना सपाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी बढती देण्यात आली. ते अद्यापही या पदावर कायम आहेत.
१९९६ मध्ये त्यांनी अकबरपूर लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवली, मात्र त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. पूर्वी हा मतदारसंघ फैजाबाद जिल्ह्यात होता. विधानसभा निवडणुकीत नशिबानं त्यांना साथ दिली. त्यांनी ९ वेळा विधानसभा निवडणूक लढवली, त्यापैकी सात वेळा त्यांना यश आलं.