Haryana CM Nayab Singh Saini : हरयाणाचे नवे मुख्यमंत्री म्हणून नायब सिंह सैनी यांचं नाव निश्चित झालं असून ते आजच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मनोहरलाल खट्टर यांच्या राजीनाम्यानंतर भाजपच्या विधीमंडळ पक्षानं सैनी यांची नेतेपदी निवड केली आहे.
हरयाणात २०१९ पासून भारतीय जनता पक्ष-जननायक जनता पक्षाच्या (भाजप-जेजेपी) युतीचं सरकार सत्तेत आहे. मनोहरलाल खट्टर हे सरकारचं नेतृत्व करत होते. मात्र लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून मतभेद झाल्यानंतर ही युती तुटली. त्यानंतर लगेचच भाजपनं खेळी करत राज्याचं नेतृत्व बदलण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार खट्टर यांनी राजीनामा दिला. त्यांची जागा आता सैनी घेणार आहेत.
नायब सिंह सैनी हे कुरुक्षेत्रचे खासदार आहेत. ओबीसी समाजातून आलेल्या सैनी यांची गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये हरियाणा भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. मागील २२ वर्षांपासून ते भाजपमध्ये सक्रिय आहेत. २००२ मध्ये भाजपशी जोडल्या गेलेल्या सैनी यांनी जिल्हा पातळीपासून अनेक पदं भूषवली आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ते आमदार म्हणून निवडून आले होते. २०१९ मध्ये लोकसभेतही त्यांनी बाजी मारली.
सैनी यांची निवड हा योगायोग नसून विचारपूर्वक केलेला प्रयोग आहे, अशी प्रतिक्रिया मावळते मुख्यमंत्री खट्टर यांनी दिली आहे. त्यांच्या विधानामध्ये अनेक अर्थ दडले आहेत. हरयाणाच्या राजकारणात ओबीसी समूहाची भूमिका महत्त्वाची असते. जाट समाजाच्या खालोखाल हरयाणात सैनी समाजाचा प्रभाव आहे. कुरुक्षेत्र, करनाल, अंबाला आणि यमुनानगर या जिल्ह्यांमध्ये ओबीसी समाजाची संख्या लक्षणीय आहे. आधीचे मुख्यमंत्री खट्टर हे पंजाबी होते. बिगर जाट मुख्यमंत्र्याची निवड म्हणून सैनी हा उत्तम पर्याय भाजपकडं होता. तोच भाजपनं निवडला आहे.
मावळते मुख्यमंत्री खट्टर आणि सैनी यांच्यात उत्तम संबंध आहेत. त्यांची मैत्री तब्बल २० वर्षे जुनी आहे. खट्टर यांच्या शिफारसीवरूनच सैनी यांना खासदारकीचं तिकीट मिळालं होतं, असं बोललं जातं. मनोहरलाल खट्टर यांच्याशी असलेली जवळीक व ओबीसी असल्याचा फायदा सैनी यांना झाला आहे.
हरयाणा विधानसभेतील एकूण ९० सदस्यांपैकी भाजपचे ४१ आमदार आहेत, तर जेजेपीचे १० आमदार आहेत. जेजीपीनं पाठिंबा काढल्यानंतरही भाजपला अपक्षांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळं सरकारला धोका नाही. विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे राज्यात ३० आमदार आहेत. इंडियन नॅशनल लोकदल आणि हरियाणा लोकहित पक्षाकडे प्रत्येकी एक जागा आहे.