Priyanka Gandhi : वायनाडमध्ये प्रियांका गांधी यांच्यासमोर उभ्या ठाकलेल्या नव्या हरिदास आहेत कोण?
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Priyanka Gandhi : वायनाडमध्ये प्रियांका गांधी यांच्यासमोर उभ्या ठाकलेल्या नव्या हरिदास आहेत कोण?

Priyanka Gandhi : वायनाडमध्ये प्रियांका गांधी यांच्यासमोर उभ्या ठाकलेल्या नव्या हरिदास आहेत कोण?

Oct 23, 2024 02:07 PM IST

Priyanka Gandhi Vs Navya Haridas : राहुल गांधी यांच्या राजीनाम्यामुळं रिक्त झालेल्या वायनाड लोकसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपनं प्रियांका गांधी यांच्या विरोधात नव्या हरिदास यांना रिंगणात उतरवलं आहे.

Priyanka Gandhi : वायनाडमध्ये प्रियांका गांधी यांच्यासमोर उभ्या ठाकलेल्या नव्या हरीदास आहेत कोण?
Priyanka Gandhi : वायनाडमध्ये प्रियांका गांधी यांच्यासमोर उभ्या ठाकलेल्या नव्या हरीदास आहेत कोण?

Priyanka Gandhi files nomination : केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघात होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी प्रियांका गांधी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणुकीच्या रिंगणात प्रथमच उतरलेल्या प्रियांका गांधी यांंच्या विरोधात भाजपनं नव्या हरीदास यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या नावाची सध्या जबरदस्त चर्चा आहे.

अवघ्या ३६ वर्षांच्या नव्या हरिदास या कालिकत विद्यापीठाच्या केएमसीटी इंजिनीअरिंग कॉलेजमधून मेकॅनिकल इंजिनिअर झाल्या आहेत. त्यांनी बीटेकची पदवी घेतली आहे. २००७ मध्ये त्यांनी पदवी घेतली. कोझिकोड महानगरपालिकेत त्या दोन वेळा नगरसेवक राहिल्या आहेत. सध्या त्या भाजपमध्ये महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस आहेत.

नव्या हरिदास यांनी आपल्या फेसबुक पेजवर स्वत:ची ओळख भाजप संसदीय पक्षाच्या नेत्या आणि भाजममोच्या प्रदेश सरचिटणीस अशी करून दिली आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या (एडीआर) म्हणण्यानुसार, नव्या हरिदास यांच्यावर कोणतेही फौजदारी गुन्हे दाखल नाहीत.

नव्या हरिदास यांची संपत्ती किती?

नव्या हरिदास यांच्याकडे १ कोटी २९ लाख ५६ हजार २६४ रुपयांची संपत्ती असून त्यांच्यावर एकूण १ लाख ६४ हजार ९७८ रुपयांचं कर्ज आहे.

का होतेय वायनाडची पोटनिवडणूक?

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वायनाडची खासदारकी सोडल्यामुळं इथं पोटनिवडणूक होत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी हे वायनाड आणि रायबरेली या दोन्ही मतदारसंघांतून निवडून आले होते. त्यापैकी वायनाडची जागा सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यांच्या जागी आता प्रियांका गांधी वाड्रा निवडणूक लढवत आहेत. प्रियांका यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षानं प्रचाराचा धडाका लावला आहे. राहुल गांधी यांना मिळालेल्या मतांपेक्षा अधिक मताधिक्यानं प्रियांका यांना निवडून आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

आतापर्यंत इतरांसाठी प्रचार केला, आज स्वत:साठी करतेय!

पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी झालेल्या सभेत प्रियांका गांधी यांनी आपल्या राजकीय प्रवासाच्या आठवणी जागवल्या. '१७ वर्षांची असताना १९८९ च्या निवडणुकीत मी पहिल्यांदा माझ्या वडिलांसाठी प्रचार केला होता. तेव्हापासून आज ३५ वर्षे झाली. या काळात आई, भाऊ आणि माझ्या अनेक सहकाऱ्यांसाठी प्रचार केला. इतक्या वर्षात स्वत:साठी प्रचार करण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे, असं प्रियांका गांधी म्हणाल्या.

भारतीय कम्युनिस्ट पक्षानं (भाकप) प्रियांका गांधी वाड्रा यांच्याविरोधात सत्यन मोकेरी यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. वायनाड पोटनिवडणुकीसाठी १३ नोव्हेंबरला मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर