मराठी बातम्या  /  Nation And-world  /  Who Is Hardeep Singh Nijjar India Vs Canada Justin Trudeau

Hardeep Singh Nijjar : अतिरेक्याच्या हत्येमुळं भारत-कॅनडात वाकयुद्ध; कोण होता हरदीप सिंग निज्जर?

who is hardeep singh nijjar
who is hardeep singh nijjar (HT)
Atik Sikandar Shaikh • HT Marathi
Sep 19, 2023 10:25 AM IST

Hardeep Singh Nijjar : हरदीप निज्जरच्या हत्येवरून कॅनडाचे पीएम जस्टिन ट्रूडो यांनी भारतावर गंभीर आरोप केले आहे. त्यामुळं नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

who is hardeep singh nijjar : दिल्लीतील जी-२० शिखर परिषद संपताच कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी भारतावर गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. खालिस्तानी टायगर फोर्स या अतिरेकी संघटनेचा नेता हरदीप सिंग निज्जर याची भारतानेच हत्या केल्याचा खळबळजनक आरोपी जस्टिन ट्रूडो यांनी केला आहे. त्यामुळं भारत आणि कॅनडात मोठा राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. भारताने कॅनडाचे सर्व आरोप फेटाळून लावत जस्टिन ट्रूडो यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. परंतु आता भारत आणि कॅनडातील वाकयुद्धाचं कारण ठरत असलेला हरदीप सिंग निज्जर कोण आहे?, असा सवाल अनेकांना पडला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

कोण आहे हरदीप सिंग निज्जर?

हरदीप सिंग निज्जर हा खलिस्तानी दहशतवादी आहे, कॅनडात राहून तो खलिस्तानी चळवळीला बळ देण्याचं काम करत होता. जून महिन्यात त्याची अज्ञात आरोपींकडून हत्या करण्यात आली होती. हरदीप निज्जरवर पंजाबमध्ये १० लाख रुपयांचं बक्षीस ठेवण्यात आलं होतं. लंडनमध्ये यापूर्वी खलिस्तान समर्थक अवतार सिंह खांडा याचा संशयास्पद मृत्यू झाला होता. त्यानंतर कॅनडात निज्जरची हत्या करण्यात आली होती. याच कारणावरून कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी भारतावर गंभीर आरोप करत निज्जरच्या हत्येच्या घटनेला आंतरराष्ट्रीय स्वरुप दिलं आहे.

हरदीप सिंग निज्जर हा मूळ पंजाबच्या जालंधर जिल्ह्यातील भारसिंघपूर गावचा रहिवासी होता. कॅनडात गेल्यानंतर त्याने खलिस्तानी चळवळीला बळ देण्याचं काम सुरू केलं होतं. नॅशनल इन्वेस्टिगेशन एजेंसीने निज्जर कॅनडात राहून देशविरोधी कारवाया करत असल्याचं स्पष्ट केलं होतं. खांडा आणि निज्जर यांनी भारतीय दूतावासासमोर निदर्शनं केली होती. तसेच भारतातील काही दहशतवादी हल्ल्यांमध्ये दोघांचा हात असल्याची माहिती तपास यंत्रणांना होती. याच प्रकरणात दोघांवर आरोपपत्र देखील दाखल करण्यात आलं होतं.