Kerala Crime News : आयुर्वेदिक टॉनिक देण्याच्या नावाखाली त्यात कीटकनाशक मिसळून प्रियकर शेरॉन राज याची हत्या केल्याप्रकरणी ग्रीश्मा नावाच्या २४ वर्षीय तरुणीला केरळच्या जिल्हा न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली आहे. शारीरिक संबंधांचं अमिष दाखवून शेरॉनचा घात करण्याच्या ग्रीष्माच्या गुन्हेगारी कृत्याकडं दुर्लक्ष करता येणार नाही, असं निरीक्षण न्यातिंकारा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयानं नोंदवलं.
‘गुन्हेगारी कृत्यांना शिक्षा मिळावी यासाठी प्रयत्न करणं ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. ग्रीष्मानं रेकॉर्डिंग करण्यास मनाई केल्यानंतरही शेरॉननं त्या आयुर्वेदिक ज्यूसचा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. याचा अर्थ काहीतरी गडबड असल्याचा संशय त्याला आला होता. त्यानंतर तब्बल ११ दिवस पाण्याचा एक घोटही न घेता शेरॉननं मृत्यूशी झुंजत होता, असं 'एएनआय’नं कोर्टाच्या हवाल्यानं म्हटलं आहे.
ग्रीष्मानं तामिळनाडूच्या कन्याकुमारी जिल्ह्यातील एका खासगी महाविद्यालयात साहित्याचं शिक्षण घेतलं आहे. मृत शेरॉन राज हा तिरुअनंतपुरम जिल्ह्यातील पारसला इथला रहिवाशी होता. तो ग्रीष्मा शिकत असलेल्या महाविद्यालयातच बीएस्सी रेडिओलॉजीच्या अंतिम वर्षाला होता. दोघांमध्ये वर्षभराहून अधिक काळ घनिष्ठ संबंध होते आणि त्यानंतर परिस्थिती बिघडली.
विशेष सरकारी वकील व्ही. एस. विनीत कुमार यांनी केलेल्या आरोपांनुसार, ग्रीष्माला शेरॉनसोबतचं नातं संपवायचं होतं, कारण तिच्या कुटुंबियांनी केरळमधील दुसऱ्या एका तरुणाशी तिचं लग्न ठरवलं होतं. त्यामुळं तिनं तिचा काका निर्मलाकुमारन नायर आणि तिच्या आईसोबत मिळून शेरॉनच्या हत्येचा कट रचला. न्यायालयानं नायर यालाही तीन वर्षांची शिक्षा सुनावली.
शेरॉनची तब्येत बिघडल्याचं समजताच व त्याचे सर्व अवयव निकामी होऊन २५ ऑक्टोबर रोजी त्याचा मृत्यू झाल्याचं समजताच आरोपींनी विषाची बाटली लपवण्याचा कट रचला, असा आरोपही सरकारी वकिलांनी केला आहे. केरळ पोलिसांनी ३१ ऑक्टोबर रोजी ग्रीष्माला अटक केली होती.
तिच्यावर भारतीय दंड संहितेअंतर्गत (आयपीसी) अनेक आरोप ठेवण्यात आले होते. तिच्यावर भादंवि कलम ३०२ (खून), ३६४ (हत्येच्या उद्देशानं अपहरण), ३२८ (जिवाला इजा पोहोचविण्याच्या हेतूनं विष पाजणं) आणि २०३ (खोटी माहिती देऊन न्यायात अडथळा आणणं) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वत:ची शैक्षणिक कामगिरी, गुन्हेगारीची कुठलीही पार्श्वभूमी नसणं आणि आई-वडिलांची एकुलती एक मुलगी असल्याचं कारण देत ग्रीष्मानं कमीत कमी शिक्षेची मागणी न्यायालयात केली.
न्यायालयानं त्यावर कठोर टिप्पणी केली. 'हा गुन्हा शांत डोक्यानं करण्यात आला आणि ग्रीष्मानं आपला गुन्हा लपवण्याचा प्रयत्नही केला. तिनं प्रियकराचा विश्वासघात केल्याचंही खंडपीठानं म्हटलं आहे.
शेरॉननं शारीरिक शोषण केल्याचा ग्रीष्माचा आरोप सिद्ध करण्यास सबळ पुराव नसल्याचंही न्यायालयानं नमूद केलं. याउलट शेरॉननं तिला कुठल्याही मेसेज किंवा संवादात तिला दोष दिला नव्हता. शेरॉन आरोपीशी प्रामाणिक होता, पण त्याचवेळी ती तिच्या होणाऱ्या दुसऱ्या नवऱ्याच्या संपर्कात होती. गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन दोषीचं वय विचारात घेता येत नाही, असं न्यायालयानं नमूद केलं.
संबंधित बातम्या