राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी भाजपचे खासदार भर्तृहरी महताब यांची लोकसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती केली. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. राष्ट्रपतींनी लोकसभा अध्यक्ष भर्तृहरी महताब यांची घटनेच्या कलम ९५ (१) अन्वये हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे.
लोकसभा अध्यक्षांची निवड होईपर्यंत लोकसभेच्या पीठासीन अधिकाऱ्याची जबाबदारी पार पाडण्यासाठी राष्ट्रपती मुर्मू यांनी घटनेच्या कलम ९५ (१) अन्वये महताब यांची हंगामी सभापती म्हणून नियुक्ती केली आहे.
१८ व्या लोकसभेचे नवनिर्वाचित सदस्य हंगामी अध्यक्षांसमोर शपथ घेतील. कटक मतदारसंघाचे खासदार महताब हे लोकसभेतील सर्वात ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत आणि त्यांनी गेल्या सात टर्मपासून लोकसभेचे खासदार आहेत.
हंगामी अध्यक्ष पदाची जबाबदारी पार पाडण्यापूर्वी महताब राष्ट्रपती मुर्मू यांच्यासमोर शपथ घेतील. नवनिर्वाचित खासदारांच्या शपथविधीवर देखरेख ठेवण्याची त्यांची भूमिका असेल.
या नियुक्तीवर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, परंपरेनुसार ज्या खासदाराने सर्वाधिक कार्यकाळ पूर्ण केला आहे, त्याला सर्व नवनिर्वाचित खासदारांना शपथ दिल्यानंतर पहिल्या दोन दिवसांसाठी सभापती प्रोटेम म्हणून नियुक्त केले जाते.
१८ व्या लोकसभेत सर्वात ज्येष्ठ खासदार कोडिकुन्निल सुरेश (काँग्रेस) आणि वीरेंद्र कुमार (भाजप) आहेत, जे दोघेही आता आठव्यांदा लोकसभेत आले आहेत. ते आता केंद्रीय मंत्री आहेत आणि म्हणूनच कोडिकुन्निल सुरेश अध्यक्ष प्रोटेम असतील अशी अपेक्षा होती. त्याऐवजी ७ वेळा खासदार राहिलेल्या भर्तृहरी महताब यांची हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते सहा वेळा बीजदचे खासदार होते आणि आता भाजपचे खासदार आहेत.'
भर्तृहरी महताब हे ओडिशातील कटक मतदारसंघातील खासदार आणि राज्यातील प्रमुख राजकारणी आहेत. महताब सात वेळा लोकसभेला खासदार म्हणून निवडून आले असून त्यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून ५७ हजाराहून अधिक मतांनी विजय मिळवला होता.
यापूर्वी ते बिजू जनता दलाचे सदस्य होते आणि त्यांनी बीजेडीच्या तिकीटावर ६ वेळा लोकसभा जिंकली आहे. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी महताब यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
गेली २५ वर्षे खासदार म्हणून कार्यरत असलेले महताब हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य असलेले आणि १९४७ च्या स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे डॉ. हरिकृष्ण महताब यांचे चिरंजीव आहेत. डॉ. हरेकृष्ण महताब यांनी ओडिशाचे दोन वेळा मुख्यमंत्रीपदही भूषवले आहे.
खासदार म्हणून उल्लेखनीय भूमिकेसाठी भर्तृहरी महताब यांना२०१७ मध्ये उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार आणि २०१७, २०१८, २०१९ आणि २०२० मध्ये संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे.
१८ व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन २४ जूनपासून सुरू होत आहे. नवनिर्वाचित सदस्य २४ व २५जून रोजी शपथ घेतील. लोकसभा अध्यक्षांची निवड २६ जून रोजी होणार आहे.
संबंधित बातम्या