Who is Atishi : अरविंद केजरीवाल यांनी सत्तेपासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदासाठी आतिशी यांचं नाव निश्चित झालं आहे. केजरीवालांच्या उत्तराधिकारी ठरणार असल्यानं त्यांच्या विषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. आतिशी नेमक्या आहेत कोण? त्यांची राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे याविषयी जाणून घेणं औचित्याचं ठरेल.
दिल्ली सरकारच्या कथित मद्य घोटाळ्यात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, खासदार संजय सिंह, मंत्री सत्येंद्र जैन हे तुरुंगात गेल्यानंतर आतिशी यांनीच दिल्ली सरकारचा गाडा हाकला होता. केंद्र सरकार व नायब राज्यपालांच्या रणनीतीला त्या तोंड देत होत्या. त्यांच्याकडं वित्त, शिक्षण आणि सार्वजनिक बांधकाम खात्यासह अनेक जबाबदाऱ्या होत्या.
आतिशी यांचा जन्म ८ जून १९८१ रोजी झाला. आतिशी यांचे वडील विजय सिंह आणि तृप्ता वाही हे दोघेही प्राध्यापक होते. मार्क्स आणि लेनिन यांच्या विचारांनी प्रभावित असलेल्या त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना 'मार्लेना' असं नाव दिलं. तेव्हापासून त्या आतिशी मार्लेना म्हणूनच ओळखल्या जाऊ लागल्या. मात्र, सक्रिया राजकारणात उतरल्यानंतर त्यांनी आडनाव न वापरण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं सध्या त्या आतिशी याच नावानं ओळखल्या जातात.
दिल्लीच्या सरकारी शाळांमध्ये मोठ्या शैक्षणिक सुधारणा घडवून आणण्याचं श्रेय आतिशी यांना दिलं जातं. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या सल्लागार म्हणून त्यांनी शाळेच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणं, शिक्षणाचा दर्जा सुधारणं आणि हॅपिनेस करिकुलम आणि ‘आंत्रप्रेन्योरशिप माइंडसेट करिकुलम’ सारखे नाविन्यपूर्ण कार्यक्रम सुरू करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
आतिशी आम आदमी पक्षाच्या (AAP) ज्येष्ठ नेत्या आहेत. कालकाजी मतदारसंघातून त्या दिल्ली विधानसभेवर निवडून आल्या आहेत. त्या आधी दिल्ली सरकारच्या शिक्षण विभागाच्या सल्लागार म्हणून प्रसिद्ध झाल्या आणि नंतर २०२० च्या निवडणुका जिंकल्यानंतर आमदार झाल्या.
आतिशी यांनी दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून इतिहास या विषयात पदवी घेतली असून नंतर त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठाची शेवनिंग स्कॉलरशिप मिळवून त्यांनी पदव्युत्तर पदवी घेतली. त्यांच्या शैक्षणिक पार्श्वभूमीचा त्यांच्या शैक्षणिक सुधारणांच्या कार्यावर लक्षणीय परिणाम झाला आहे.
माजी मंत्री मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांनी कायदेशीर अडचणींमुळे राजीनामा दिल्यानंतर मार्च २०२३ मध्ये आतिशी यांचा दिल्ली मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. त्यांनी शिक्षण, सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), ऊर्जा आणि पर्यटन या खात्यांचा कार्यभार सांभाळला.
आतिशी शिक्षण क्षेत्रातील सुधारणांबरोबरच पर्यावरणविषयक मुद्द्यांसाठीही आग्रही आहेत. त्यांनी दिल्लीत अक्षय ऊर्जा, प्रदूषण नियंत्रण आणि शाश्वततेशी संबंधित धोरणांना सक्रिय प्रोत्साहन दिलं आहे.