New Sri Lankan President: श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत मार्क्सवादी नेते अनुरा कुमार दिसानायके यांनी ४२.३१ टक्के मते मिळवत विजय मिळवला आहे. रविवारी पूर्ण निकाल जाहीर होण्यापूर्वीच विजयाचा दावा केला होता. यानंतर निवडणूक आयोगाने निकाल जाहीर केल्यानंतर अनुरा कुमार दिसानायके यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, हा विजय आपल्या सर्वांचा आहे.
कोलंबोच्या वसाहतकालीन राष्ट्रपती सचिवालयात दिसानायके सोमवारी शपथ घेणार आहेत. त्यांचा सत्तेवर येणे, हे देशाच्या आर्थिक घसरणीला जबाबदार असलेल्या राजकीय प्रस्थापितांना नाकारण्याचे द्योतक आहे. २०१९ च्या अध्यक्षीय निवडणुकीत केवळ ३ टक्क्यांहून अधिक मते मिळविलेल्या जेव्हीपीसाठी हा विजय मोठा बदल दर्शवतो. शनिवारी झालेल्या या निवडणुकीत ७६ टक्के मतदान झाले असून १७ दशलक्ष श्रीलंकन नागरिक मतदानाचा हक्क बजावला.
दिसानायके यांना जवळपास ४२ टक्के मते मिळाली, तर त्यांचे निकटतम प्रतिस्पर्धी सजित प्रेमदासा यांना केवळ २३ टक्के मते मिळाली. विद्यमान अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे केवळ १६ टक्के मतांसह तिसऱ्या स्थानावर आहेत. विक्रमसिंघे यांनी अद्याप औपचारिकरित्या कबुली दिलेली नाही. परंतु, परराष्ट्रमंत्री अली साबरी म्हणाले की, ‘दिसानायके विजयी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.'