LS polls : डोंगराएवढा विजय! लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मतांच्या फरकानं जिंकणारा उमेदवार कोण?
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  LS polls : डोंगराएवढा विजय! लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मतांच्या फरकानं जिंकणारा उमेदवार कोण?

LS polls : डोंगराएवढा विजय! लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मतांच्या फरकानं जिंकणारा उमेदवार कोण?

Jun 07, 2024 06:19 PM IST

biggest victory in lok sabha election 2024 : लोकसभा निवडणुकीत शेकडो उमेदवारांनी लाखांहून अधिक मताधिक्यानं विजय मिळवला. मात्र, सर्वाधिक मतांच्या फरकानं विजय मिळवणारा उमेदवार कोण? वाचा!

डोंगराएवढा विजय! लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मतांच्या फरकानं जिंकणारा उमेदवार कोण?
डोंगराएवढा विजय! लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मतांच्या फरकानं जिंकणारा उमेदवार कोण?

biggest victory in lok sabha election 2024 : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागून तीन दिवस उलटल्यानंतरही निकालाचं कवित्व सुरूच आहे. राजकीय पक्ष विजय-पराभवाचं विश्लेषण करत असताना मतांच्या आकडेवारीबाबत चक्रावून टाकणारी माहिती समोर येत आहे. यावेळच्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मतांच्या फरकानं निवडणूक जिंकणारा उमेदवारही समोर आला आहे.

सर्वाधिक मतांच्या फरकानं निवडणूक जिंकणाऱ्या उमेदवारांमध्ये आसामच्या धुबरी मतदारसंघातील काँग्रेसचे ५९ वर्षीय उमेदवार रकीबुल हुसेन यांनी बाजी मारली आहे. त्यांनी तब्बल १० लाख १२ हजार ४७६ मतांच्या फरकानं विजय मिळवला आहे. त्यांना एकूण १४ लाख ७१ हजार ८८५ मतं मिळाली. त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी, माजी खासदार मोहम्मद बदरुद्दीन अजमल यांना ४,५९,४०९ मतं मिळाली.

खरंतर मध्य प्रदेशच्या इंदूर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार शंकर लालवानी यांनी बहुजन समाज पक्षाचे उमेदवार संजय सोळंकी यांचा ११,७५,०९२ मतांनी पराभव केला आहे. त्या अर्थानं त्यांचं मताधिक्य रकीबुल हुसेन यांच्यापेक्षा अधिक आहे. मात्र, संजय लालवानी यांच्या मतदारसंघात नोटा (none of the above) या पर्यायाला २ लाख १८ हजार ६७४ मतं मिळाली आहे. त्यामुळं त्यांचं प्रत्यक्ष मताधिक्य १०,०८,०७७ इतकं झालं आहे. त्यामुळं सर्वाधिक मताधिक्याच्या यादीत ते दुसऱ्या क्रमांकावर गेले आहेत.

कोण आहेत रकीबुल हुसेन?

रकीबुल हुसेन हे आसाममधील काँग्रेस नेते आहेत. ते २०२१ पासून आमदार आहेत. आसाम विधानसभेत ते समागुरी विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. २००२ ते २००६ या कालावधीत तरुण गोगोई सरकारच्या काळात त्यांनी तुरुंग आणि होमगार्ड, सीमा क्षेत्र विकास राज्यमंत्री म्हणूनही काम पाहिलं आहे. २००६ ते २०११ या काळात त्यांनी राज्याचे पर्यावरण व वन, माहिती व जनसंपर्क मंत्री म्हणूनही काम पाहिलं आहे.

सर्वाधिक मतं मिळवणाऱ्या इतर उमेदवारांवर नजर

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि पाच वेळा खासदार राहिलेले शिवराज सिंह चौहान यांनी विदिशा मतदारसंघातून एकूण ११,१६,४६० मतांनी विजय मिळवला. त्यांनी निकटचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रताप भानू शर्मा यांचा ८,२१,४०८ मतांनी पराभूत केला.

गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांनी नवसारी मतदारसंघात ७ लाख ७३ हजार मतांनी विजय मिळवला. त्यांचं मताधिक्य राज्यात सर्वाधिक आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार नैशाधभाई भूपतभाई देसाई यांना २ लाख ५७ हजार ५१४ मतं मिळाली.

भाजपचे नेते अमित शहा यांनी गुजरातच्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला आहे. त्यांनी यावेळी ७,४४,७१६ मतांनी विजय मिळवला. त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या सोनल पटेल यांना २,६६२५६ मतं मिळाली होती.

हेही वाचा: …म्हणून मोदी-शहांनी इकबाल मिर्चीची प्रॉपर्टी प्रफुल पटेल यांना परत केली; संजय राऊत यांनी संधी साधली!

तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालच्या डायमंड हार्बर मतदारसंघातून ७,१०,९३० मतांनी विजय मिळवला.

त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते बिप्लब कुमार देब यांनी त्रिपुरा पश्चिम लोकसभा मतदारसंघातून ६,११५७८ मतांनी विजय मिळवला.

गुजरातमधील वडोदरा मतदारसंघात भाजपचे हेमांग जोशी यांनी ५,८२,१२६ मतांनी विजय मिळवला आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी पढियार जशपालसिंह महेंद्रसिंह यांना २ लाख ९१ हजार ६३ मतं मिळाली.

माजी आयएएस अधिकारी आणि काँग्रेसचे उमेदवार शशिकांत सेंथिल यांनी तिरुवल्लूर मतदारसंघातून ५,७२,१५५ मतांनी विजय मिळवला. त्यांना एकूण ७,९६,९५६ मतं मिळाली.

Whats_app_banner
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर