Lawrence Bishnoi Brother Anmol Bishnoi : कुख्यात गँगस्टर व बिश्नोई गँगचा म्होरक्या लॉरेन्स बिश्नोई सध्या गुजरातमधील तुरुंगात आहे. मात्र, असे असले तरी बिश्नोई गँग आपल्या टोळीचे काम चालवतच आहे. लॉरेन्सचा भाऊ अनमोल बिश्नोई हा सध्या बाहेर असून तो गँगचे काम पाहत असल्याच पुढं आले आहे. अनमोल बिश्नोई हा परदेशातून टोळी चालवत असून सर्व कारवाया तेथून हाताळत आहे. काँग्रेस नेते बाबा सिद्दिकी यांची हत्या व त्यानंतर सलमान खानला धमकी देण्यातही अनमोल बिश्नोईचाच हात असल्याचं पुढं आले आहे. दरम्यान, वाँटेड गुन्हेगार अनमोल बिश्नोई हा कोठे लपून बसला आहे याची माहिती अमेरिकेने मुंबई पोलिसांना दिली आहे.
लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या कारवायांना आळा घालण्यासाठी मुंबई पोलिस प्रयत्न करत आहेत. दरम्यान, लॉरेन्सचा धाकटा भाऊ अनमोल बिश्नोई देशात असल्याची माहिती अमेरिकन अधिकाऱ्यांनी मुंबई पोलिसांना दिली आहे. त्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू केली आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेने गेल्या महिन्यात विशेष न्यायालयात धाव घेतली होती. इंडियन एक्स्प्रेसने एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. १६ ऑक्टोबर रोजी मुंबई पोलिसांनी कोर्टाला सांगितले की, सलमान खानच्या घरातील गोळीबार प्रकरणात अनमोलचे प्रत्यार्पण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
लॉरेन्स बिश्नोई तुरुंगात असताना एप्रिलमध्ये सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करण्याच्या प्रकरणात अनमोलचा सहभाग असल्याचा आरोप आहे. नुकतेच राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या हत्येतही अनमोलचे नाव पुढे आले होते. गोळीबार करणाऱ्या आरोपींशी संपर्कात असल्याचं तपासात पुढं आलं आहे.
गेल्या आठवड्यात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अनमोल बिश्नोईवर १० लाखरुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. एजन्सीने म्हटले आहे की, फरार असलेला अनमोलवर १८ गुन्हे दाखल आहेत, ज्यात त्याने २०२२ मध्ये पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याची हत्या करणाऱ्या आरोपींना शस्त्रे आणि पैसा पुरवला होता.
एका अधिकाऱ्याने इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, सलमान खानच्या आरोपपत्रात अनमोलला मोस्ट वॉन्टेड आरोपी म्हणून घोषित करण्यात आले होते. त्यानंतर रेड कॉर्नर नोटीस (आरसीएन) जारी करण्यात आली होती. आरसीएनच्या आधारे अमेरिकन अधिकाऱ्यांनी काही महिन्यांपूर्वी मुंबई पोलिसांशी संपर्क साधत नमोल अमेरिकेत असल्याची माहिती दिली.
अनमोल बिश्नोईला सध्या अमेरिकन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे की नाही याबाबत स्पष्टता नाही, परंतु तो अमेरिकेत कुठे लपला आहे याची माहिती पोलिसांना आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. न्यायालयाने पोलिसांना आवश्यक कागदपत्रे तयार करण्याची परवानगी दिली आहे. ही कागदपत्रे गृहमंत्रालयाला देण्यात आली असून, त्यानंतर परराष्ट्र मंत्रालय अमेरिकन अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे.
प्रत्यार्पण प्रक्रियेला मंजुरी मिळाल्यास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला त्याचा ताबा मिळणार आहे. मुंबई पोलिसांना लॉरेन्स बिश्नोईचा ताबा मिळालेला नाही. सध्या तो गुजरातच्या साबरमती तुरुंगात आहे. गेल्या महिन्यात भारताने कॅनडातून आपले मुत्सद्दी माघारी बोलावल्यानंतर काही तासांतच रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिसांनी आरोप केला होता की, कॅनडाच्या भूमीवर दहशत पसरवण्यासाठी भारत सरकारचे एजंट लॉरेन्स बिश्नोई टोळीसोबत मिळून काम करत आहेत. भारताने सातत्याने हे आरोप फेटाळून लावत ते हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे.