IMD Update on Monsoon : प्रति चक्रीवादळ आणि अल निनोच्या प्रभावामुळं यंदा पूर्व आणि दक्षिण भारतातील अनेक भागात तीव्र उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. उकाड्यामुळं लोक अक्षरश: हैराण झाले आहेत. उष्ण आणि दमट हवामानापासून दिलासा मिळावा म्हणून लोक मोसमी पावसाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. या सर्वांसाठी भारतीय हवामान विभागानं खूषखबर आणली आहे.
नैर्ऋत्य मोसमी वारे ३१ मे रोजी केरळमध्ये दाखल होतील, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागानं वर्तवला आहे. यात चार दिवस मागेपुढे होऊ शकतात, असंही हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे.
नैर्ऋत्य मॉन्सून आज २२ मे २०२४ रोजी दक्षिण अरबी समुद्राचा काही भाग, मालदीवचा आणखी काही भाग, कोमोरिन परिसर, दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान निकोबार बेटे आणि अंदमान समुद्रात दाखल झाला आहे. येत्या दोन दिवसांत दक्षिण बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग, अंदमान-निकोबार बेटांचा उर्वरित भाग, अंदमान समुद्र आणि पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरातील काही भागांमध्ये नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या पुढील वाटचालीसाठी अनुकूल परिस्थिती आहे.
भारतात मान्सूनच्या आगमनाचा अंदाज वर्तवण्यासाठी हवामान विभाग विविध निर्देशांकांचा वापर करतो. यामध्ये वायव्य भारतातील किमान तापमान, दक्षिण द्वीपकल्पातील मान्सूनपूर्व पावसाचे प्रमाण, दक्षिण चीन समुद्रावरील आउटगोइंग लाँगवेव्ह रेडिएशन (OLR), विषुववृत्तीय आग्नेय हिंदी महासागरावरील कमी क्षोभमंडलीय प्रादेशिक वारा, नैर्ऋत्य पॅसिफिक महासागरावरील ओएलआर आणि विषुववृत्तीय ईशान्य हिंदी महासागरावरील अप्पर ट्रोपोस्फेरिक झोनल वाऱ्याचा समावेश आहे.
राजस्थान, पंजाब, हरयाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेशसह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान अंदाज संस्थेनं बुधवारी दिला. २१ मे रोजी या भागात कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यानंतर हा इशारा देण्यात आला आहे.
पंजाब, हरयाणा, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात २५ मेपर्यंत उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. जम्मू, हिमाचल प्रदेश, गुजरात आणि मध्य प्रदेशच्या काही भागात २५ मेपर्यंत उष्णतेची लाट असेल, तर महाराष्ट्रात २४ मेपर्यंत अशीच परिस्थिती राहील, असा अंदाज आहे.