अमेरिकेतून एक धक्कादायक घटना समोर आली असून, एका व्यक्तीला पत्नीची हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. आरोपी पतीने गुगलवर दुसरे लग्न कधी करता येते? असं सर्च केलं होतं. यानंतर त्याच्यावरील संशय वाढला व महिलेच्या गायब होण्याच्या प्रकरणाचा पर्दाफाश झाला.
आरोपी पत्नी गायब झाल्यानंतर काही दिवसांनी इंटरनेटवर पुन्हा लग्न करण्याचा मार्ग शोधत होता. मिळालेल्या माहितीनुसार, ३३ वर्षीय नरेश भट्टवर त्याची २८ वर्षीय पत्नी ममता भट्टची हत्या केल्याचा आरोप आहे.
अमेरिकेतील व्हर्जिनिया राज्यात ही घटना घडली आहे. पत्नीची हत्या केल्याच्या आरोपावर आरोपी पती नरेश भट्ट याला अटक करण्यात आली आहे. ममता मूळची नेपाळी असून २९ जुलैपासून बेपत्ता होती. तिचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही, असे सांगण्यात येत आहे.
प्रिन्स विल्यम काउंटी सर्किट कोर्टात दाखल करण्यात आलेल्या खटल्यानुसार, नरेशने "पत्नीच्या मृत्यूनंतर मी दुसरे लग्न कधी करू शकतो?" या सारख्या विषयांवर ऑनलाइन सर्च केले होते. शिवाय ममता बेपत्ता झाल्यानंतर काही दिवसांतच नरेश वॉलमार्टकडून तीन चाकू आणि साफसफाईचे साहित्य खरेदी करताना दिसला. या तीनपैकी दोन चाकू अद्याप सापडले नसल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
ममता बेपत्ता झाल्यानंतर नरेशने रक्ताने माखलेली बाथ मॅट आणि इतर संशयास्पद वस्तू कचऱ्यात टाकल्या होत्या. डीएनए चाचणीत घरातील रक्ताच्या खुणा ममता यांच्या रक्ताशी जुळत असल्याचे आढळून आल्याने तिची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
कामावर हजर न झाल्याने ममता बेपत्ता झाल्याचे ५ ऑगस्ट रोजी तक्रार दाखल केली. ते दोघे विभक्त होण्याच्या तयारीत असल्याचे नरेशने पोलिसांना सांगितले. पण त्यांची अस्पष्ट विधाने आणि घडामोडींची कालमर्यादा यामुळे शंका निर्माण झाली. नरेशला २२ ऑगस्ट रोजी घराची झडती घेतल्यानंतर अटक करण्यात आली होती आणि सप्टेंबरमध्ये त्याचा जामीन फेटाळण्यात आल्यापासून तो कोठडीत आहे.
नरेशविरुद्धच्या पुराव्यांमध्ये सर्व्हेलन्स कॅमेऱ्यातील फुटेज, रक्ताचे ठसे आणि संशयास्पद ऑनलाइन शोध यांचा समावेश आहे. ती अजूनही जिवंत असल्याचा दावा वकिलांनी केला आहे, पण न्यायालयात सादर करण्यात आलेले डीएनए आणि इतर पुरावे हा दावा कमकुवत करत आहेत.
संबंधित बातम्या