Vijay Diwas : भारतासाठी १६ डिसेंबर १९७१ चा दिवस ही केवळ एक तारीख नसून गौरवशाली गाथा आहे. याच दिवशी भारतीय लष्कराने आपल्या शौर्य आणि रणनीतीच्या जोरावर इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळवला. केवळ १३ दिवसांत पाकिस्तानच्या सैन्याला पराभूत करत ९३ हजार जवानांनी भारतीय लष्करापुढे शरणागती पत्करली. हा केवळ भारताचा विजय नव्हता, तर बांगलादेशच्या जन्माची कहाणी देखील होती.
प्रत्येक भरतीयांसाठी डिसेंबर महिना हा अभिमानाचा आणि गर्वाचा आहे. डिसेंबर महिन्यात पाकिस्तानने भारतावर लादलेल्या १९७१ च्या युद्धाला सुरवात झाली होती. केवळ १४ दिवसांत भारतीय सैन्याने १६ डिसेंबर रोजी पाकिस्तानला हरवत पाकिस्तानचे दोन तुकडे केले होते. तेव्हाचा पूर्व पाकिस्तान म्हणजे आजचा बांग्लादेश स्वतंत्र झाला होता. तब्बल ९३ हजार पाकिस्तानी सैन्याने भारतापुढे आत्मसमर्पण केले होते. हा विजय आपण 'विजय दिवस' म्हणून साजरा करतो. हे युद्ध नेमके कसे घडले. भारताने पाकिस्तानला कसे पराभूत केले जाऊन घेऊयात.
पूर्व पाकिस्तानमधील मूजीबूर रेहमान खान यांनी पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीत यश मिळवले तरी त्याचा विजय पाकिस्ताने मान्य न करत पूर्व पाकिस्तानातील (आताचा बांगलादेश) जनतेवर अत्याचार सुरू करण्यास सुरुवात केली. यामुळे पाकिस्तान सैन्याविरोधात मुक्तीबाहिनी ही संघटना लढू लागली. मोठ्या प्रमाणात बांग्लादेशी नागरिक भारतात स्थलांतरित होऊ लागले होते. हा प्रश्न गंभीर होत असल्याने भारताने मुक्तीबहिणीची मदत करण्याचे ठरवले. भारताने त्यांना पाकिस्तानी सैन्याविरोधात लढण्यास प्रशिशिक्षित केले होते. असे असले तरी भारत या सर्व घडामोडींपासून लांब होता. मात्र, या मागे भारत असल्याचे म्हणत पाकिस्तानने भारतावर ३ डिसेंबर रोजी आक्रमण केले. त्यावेळेच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लष्कराला थेट युद्धात उतरत पाकिस्तानला उत्तर देण्याचे आदेश दिले.
पूर्व पाकिस्तानात (आजचा बांगलादेश) पाकिस्तानी सैन्याचा अत्याचार वाढला होता. पाकिस्तानी सैन्याने लाखो निरपराध बांग्लादेशी नगरिकांचा बळी घेतला. त्यांच्यावर अनेक अत्याचार केले. यामुळे भारताच्या पूर्व सीमेवर मोठ्या प्रमाणात बांग्लादेशातून निर्वासितांचे लोंढे येऊ लागले.
ऑपरेशन चंगेज खान अंतर्गत पाकिस्तानने भारतावर हल्ला केला. यानंतर भारतीय लष्कराने वेगवान हल्ला करत केवळ १४ दिवसांत पूर्व पाकिस्तान स्वतंत्र करत बांग्लादेशची निर्मिती केली. जगात आतापर्यंत झालेल्या युद्धात एवढ्या कमी दिवसात तब्बल ९३ हजार सैनिकांनी आत्मसमर्पण करण्याची ही पहिलीच वेळ होती. १६ डिसेंबर १९७१ ला भारताचा विजय झाला. हाच दिवस विजय दिवस म्हणून साजरा केला जातो.
या युद्धात भारतीय लष्कर, नौदल आणि वायु दलाने नेत्रदीपक कामगिरी केली. नौदलाने पाकिस्तानी बंदरावर क्षेपणास्त्र हल्ले करत कराची बंदर उद्ध्वस्त केले होते. यानंतर भारतीय वायु दलाने पाकिस्ताच्या वायुदलाची आणि लष्कराचे कंबरडे मोडले होते.
भारतीय सैनिकांनी केवळ १४ दिवसांत ढाक्याला वेढा घातला. पाकिस्तानचे तब्बल ९३ हजार सैन्य मृत्यूच्या तावडीत सापडले. त्यावेळी पाकिस्तानचे जनरल नियाजी यांना भारतासमोर आत्मसमर्पण करण्यास सांगितले. मात्र, ते तयार नव्हते भारतीय लष्करप्रमुख मॉनेक शॉ यांनी आजच्या दिवशी जनरल जेएफआर जेकब यांना फोन करत ढाक्याला पाठवले. तो पर्यन्त ढाका येथील गव्हर्नर हाऊसला भारतीय सैनिकांनी वेढा घातला होता. जेकब यांनी ढाका येथे जात जनरल नियाजींशी भेट घेतली. त्यांना आत्मसमर्पणाचा दस्तऐवज दाखवला. तो वाचून जनरल नियाजी भडकले आणि आत्मसमर्पण करणार नसून सीजफायर होणार असे म्हटले. मात्र, जनरल जेकब यांनी त्यांना सुनावत पाकिस्तानने आत्मसमर्पणाच्या पत्रावर सह्या केल्या तरच पाकिस्तानचे सैनिक आणि त्यांच्या परिवारांच्या संरक्षणाची हमी घेऊ सांगितले. नाही तर मुक्तीबहिनीचे सैनिक तुम्हाला सोडणार नाही. होणाऱ्या परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा, असे जेकब म्हणाले. यानंतर नियाजी यांना अर्ध्या तासाची वेळ देत ते थांबले. यानंतर त्यांनी नियाजींना तीन वेळा ते आत्मसमर्पणाला तयार आहेत का नाही या बाबत विचारणा केली. मात्र, त्यांनी उत्तर न दिल्याने त्यांनी याला मुकसंमती दिली असे जाहीर करत ढाकाच्या रेसकोर्स मैदानावर आत्मसमर्पणासाठी तयारी केली.
दरम्यान, भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानची चारही बाजूने कोंडी केली. पश्चिम सीमेवरील नौदलाचा घेराव आणि पूर्व पाकिस्तानातील नो फ्लाय झोनने पाकिस्तानला वेठीस धरले. भारतीय नौदलाची शान असलेली आयएनएस विक्रांत समुद्रात शत्रूचे मार्ग बंद करत होती. भारतीय हवाई दलाने आकाशात आपला झेंडा फडकवला आणि तीन दिवसांतच पूर्व पाकिस्तानवर हवाई वर्चस्व प्रस्थापित केले. जमिनीवर भारतीय सैनिक किल्लेदार शहरांच्या दिशेने पुढे सरकत होते. सिलहट, टांगेल, चटगांव, एकापाठोपाठ एक शहरे कोसळत गेली. टांगाईल येथे पाच हजार पॅराट्रूपर्सच्या धाडसी उडीने शत्रूचे मनोधैर्य ढवळून निघाले आणि त्यानंतर ढाक्याकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाला.
१४ डिसेंबर रोजी भारतीय हवाई दलाने ढाका येथील गव्हर्नर हाऊसवर बॉम्बहल्ला केला होता. संपूर्ण प्रशासन हादरले होते. त्यानंतर नियाझीयांनी आपल्या हँडलर्सकडे मदत मागितली पण शेवटच्या श्वासापर्यंत लढावे लागेल, असे उत्तर आले. थकलेल्या नियाझीने शस्त्रटाकण्याचा निर्णय घेतला आणि तो क्षण १६ डिसेंबररोजी ९३,००० पाकिस्तानी सैनिकांनी भारतपुढे शरणागती पत्करली.
या युद्धाने पाकिस्तानची फाळणी तर झालीच, पण बांगलादेशच्या रूपाने जगाला एक नवे राष्ट्रही दिले. विजय दिन हा केवळ युद्धविजयाचा दिवस नसून अत्याचाराविरोधात आवाज उठवणाऱ्या निर्धाराचे प्रतीक आहे. योग्य रणनीती, नेतृत्व आणि शौर्याने इतिहास बदलता येतो, याची आठवण दरवर्षी १६ डिसेंबर आपल्याला करून देते आणि हीच त्या या युद्धाची खरी कहाणी आहे.
संबंधित बातम्या