WhatsApp Blue Tik : जगातील आघाडीची टेक कंपनी मेटाचे मालक मार्क झुकरबर्गने यांनी लोकप्रिय मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲपवर मेटा अकाऊंट व्हेरिफाईड सेवा सुरू करण्यासंदर्भात नवी घोषणा केली आहे. मार्कने सांगितले की व्हॉट्सॲप बिझनेस वापरकर्त्यांना आता लवकरच मेट व्हेरिफाईड सेवेचा लाभ मिळेल आणि ही सेवा लवकरच भारतात उपलब्ध करून दिली जाणार आहे. याचा अर्थ असा की लवकरच व्हेरिफिकेशन ब्लू टिक्स इन्स्टाग्राम आणि फेसबुकसह आता व्हॉट्सॲपवरही दिसणार आहे.
ब्राझीलमधील साओ पाउलो येथे कंपनीच्या वार्षिक सभेत मार्कने या बाबत माहिती दिली, हा नवीन बदल भारतातही देखील आणला जाणार आहे. तर भारताव्यतिरिक्त, हे नवे फीचर ब्राझील, इंडोनेशिया आणि कोलंबियामध्ये देखील उपलब्ध करून दिले जाणार आहे. या नव्या वैशिष्ट्यासह, वापरकर्त्यांना ब्लू टिक खरेदी करण्याचा पर्याय मिळेल आणि त्या बदल्यात त्यांना अकाऊंट व्हेरिफाईड ही सुविधा दिली जाणार आहे.
मेटाने गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये यूझर्ससाठी Meta Verified या नव्या फीचरची घोषणा केली होती. यानंतर, गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये मुंबईत झालेल्या कंपनीच्या एका संवाद परिषदेत, मेटा व्हेरिफाइड सेवेचा विस्तार इन्स्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सॲपवर केला जाईल, असे कंपनीने जाहिर केले होते. या सेवेसह, निर्माते किंवा वापरकर्ते काही ठराविक सदस्यता शुल्क भरून व्हेरिफाईड ब्लू टिक्स खरेदी करू शकतात.
कंपनी सबस्क्रिप्शन बंडल म्हणून ही सेवा ऑफर करत आहे. इंस्टाग्राम आणि फेसबूक या दोन्हींवर निळ्या टिक्स दिसतात. आता व्हॉट्सॲपवर देखील हीच ब्लू टिक अकाऊंट व्हेरिफाईड असल्यास दिसणार आहे. यासाठी वापरकर्त्यांना सरकारी आयडीने त्यांची ओळख ही व्हेरिफाईड करावी लागणार आहे.
नवीन बदलाचा फायदा असा होईल की वापरकर्ते सत्यापित व्यवसाय ओळखण्यास सक्षम असतील. कंपनीला आशा आहे की त्यांच्या मदतीने व्हॉट्सॲपवरील घोटाळ्यांनाही आळा बसेल. चांगली गोष्ट म्हणजे जे आधीच Meta Verified साठी पैसे देत आहेत त्यांना WhatsApp व्हेरिफिकेशनसाठी अतिरिक्त पैसे द्यावे लागणार नाहीत.
व्हॉट्सॲपने आपल्या बिझनेस ॲपमध्ये अनेक नवीन फीचर्सचा समावेश केला आहे, ज्याच्या मदतीने व्यवसायांचे काम सोपे होणार आहे. या वैशिष्ट्यांसह, व्यवसाय ग्राहकांशी सहजपणे जोडले जातील. या वैशिष्ट्यांच्या यादीत व्यवसाय कॉलपासून ते एआय टूल्सपर्यंत सर्व काही समाविष्ट राहणार आहे. Meta Al Tools आणि Call a Business वैशिष्ट्ये देखील लवकरच प्रत्येकासाठी उपलब्ध असतील.
संबंधित बातम्या