Army Chief General Upendra Dwivedi on Galwan : उत्तर सीमेवरील परिस्थिती संवेदनशील पण स्थिर असून कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी लष्कर पूर्णपणे सज्ज आणि सक्षम आहे, असे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी बुधवारी सांगितले. ते म्हणाले की, 'उत्तरेकडील सीमा सुरक्षित आहेत, कारण तेथे भारतीय सैन्य तैनात आहे आणि सीमेच्या रक्षणासाठी आवश्यक तेवढ्या संख्येत लष्कर उपस्थितीत आहे,' असे ते पुण्यात लष्करदिनानिमित्त आयोजित संचनल सोहळ्या दरम्यान पत्रकारांशी बोलतांना म्हणाले.
जनरल द्विवेदी म्हणाले, उत्तर सीमेवरील परिस्थिती स्थिर आहे. परंतु त्याच वेळी संवेदनशील देखील आहे. ते म्हणाले की, "गलवानमध्ये जे काही घडलं त्याची पुनरावृत्ती होता कामा नये". भारतीय लष्कर कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आणि सक्षम आहे. उत्तर सीमेवर आधुनिक उपकरणे आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधा विकसित करण्यावर विशेष लक्ष दिले गेले आहे. भविष्यात गलवानसारख्या घटना पुन्हा घडू नये, असे म्हणत लष्करप्रमुख म्हणाले, गलवानमध्ये जे घडले ते पुन्हा होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. याचा अर्थ आपले डोळे आणि कान उघडे असले पाहिजे. देशातील प्रत्येक नागरिकाने या विषयावर लक्ष केंद्रित करावे. भविष्यात कोणत्याही अनपेक्षित परिस्थितीला सामोरे जावे लागू नये, यासाठी आपण सर्वांनी या मुद्द्यावर एकत्र यायला हवे. १५ जून २०२० रोजी लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झटापट झाली होती, ज्यात भारताचे २० जवान शहीद झाले होते. तर चिनी सैन्याचे ४० जवान ठार झाले होते. चीनने अधिकृत आकडा समोर आलेला नाही.
पुण्यातील ७७ व्या लष्कर दिनाच्या कार्यक्रमात बोलताना द्विवेदी म्हणाले की, नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधी कायम आहे, पण घुसखोरीचे प्रयत्न सुरूच आहेत. उत्तर सीमेवरील परिस्थिती संवेदनशील पण स्थिर असल्याचे त्यांनी सांगितले. आमचे लष्कर कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पूर्णपणे सज्ज आणि सक्षम आहे. भारतीय लष्कराला आधुनिक व तंत्रज्ञानाधारित लष्कर बनविण्याच्या दिशेने आम्ही वाटचाल करत राहू, असे ते म्हणाले. मराठा राजवटीच्या काळापासून हे शौर्य आणि शौर्याचे ठिकाण असल्याने पुण्यात होणाऱ्या ७७ व्या लष्करदिनाच्या परेडला विशेष महत्त्व आहे. ते म्हणाले की, पुण्यात लष्कर दिन साजरा करणे हा पुण्याच्या वारशाशी लष्कराचं असलेलं सखोल नातं दर्शविते. पुण्यात पहिल्यांदाच हा सोहळा पार पडला. लष्कराच्या दक्षिण कमांडअंतर्गत येणाऱ्या बॉम्बे इंजिनिअर्स ग्रुप (बीईजी) आणि सेंटर मध्ये आर्मी डे परेड (एडीपी) आयोजित करण्यात आली होती.
संबंधित बातम्या