
Rahul Gandhi on Disqualification : सुरत जिल्हा न्यायालयानं एका वक्तव्याच्या प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभा सचिवालयानं काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली आहे. त्यावरून देशभरात राजकीय गदारोळ सुरू आहे. विरोधी पक्षांकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. आता खुद्द राहुल गांधी यांनी या घडामोडींवर प्रतिक्रिया दिली आहे.
राहुल गांधी यांनी पहिलं ट्वीट केलं आहे. ‘मी भारतासाठी लढत आहे. त्यासाठी कुठलीही किंमत मोजण्यास तयार आहे,’ असं राहुल गांधी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
राहुल गांधी यांचं हे ट्वीट अवघ्या तासाभरात १४ हजारांहून अधिक लोकांनी रीट्वीट केलं आहे. तर, या ट्वीटला ४० हजारांहून अधिक लाइक्स आले आहेत. राहुल यांच्या ट्वीटवर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. बहुतेक लोकांनी राहुल यांना नि:संदिग्ध पाठिंबा दर्शवला आहे. लोकशाही वाचवण्याच्या या लढाईत आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत, असं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. तर, काहींनी राहुल गांधी यांना 'विजयी भव' असं म्हणून शुभेच्छा दिल्या आहेत.
काँग्रेसची महत्त्वाची बैठक
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या गोटात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री व काँग्रेसचे मुरब्बी नेते राजस्थानहून या बैठकीसाठी दिल्लीत येत आहेत. या बैठकीत मोदी सरकार विरोधातील पुढील रणनीती ठरवली जाण्याची शक्यता आहे.
उच्च न्यायालयाच्या निर्णयावर भिस्त
राहुल गांधी हे २०१९ साली केरळमधील वायनाड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. त्यांचं सदस्यत्व रद्द झाल्यामुळं आता ही जागा रिक्त झाली आहे. राहुल गांधी हे सुरत न्यायालयाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जाणार आहेत. उच्च न्यायालय त्यांच्या याचिकेवर काय निर्णय देतं, यावर बरंच काही अवलंबून राहणार आहे.
संबंधित बातम्या
