Cyber Crime: डिजिटल वेडिंग कार्डचा ट्रेंड वाढल्याने सायबर गुन्हेगारांनी एक नवी युक्ती अवलंबली आहे. आता सायबर गुन्हेगार व्हॉट्सअॅपवर डिजिटल लग्न पत्रिका पाठवून नागरिकांची फसवणूक करत आहेत. यामुळे नागरिकांनी अनोळखी नंबरवरून आलेल्या डिजिटल लग्नपत्रिकेवर क्लिक करू नये नाहीतर सायबर गुन्हेगारी तुमची वैयक्तिक माहिती चोरून तुमच्या बँक खात्यातील पैसे गायब करू शकतात.
सायबर गुन्हेगार या फाईल्स एपीके स्वरूपात पाठवतात. कोणी डाऊनलोड करताच हा मालवेअर फोनमध्ये इन्स्टॉल होतो आणि गुन्हेगारांना फोनचा पूर्ण अॅक्सेस देतो. त्यानंतर सायबर गुन्हेगार तुमच्या फोनवरून मेसेज पाठवू शकतात, तुमची माहिती चोरू शकतात आणि त्याचा गैरवापर करून पैसे उकळू शकतात.
न्यूज १८ च्या रिपोर्टनुसार, हिमाचल प्रदेश सायबर पोलिसांनी अशा फसवणुकीच्या घटनांबद्दल नागरिकांना सतर्क केले आहे. हिमाचल प्रदेश राज्य सीआयडी आणि सायबर क्राइम विभागाचे वरिष्ठ पोलिस अधिकारी मोहित चावला यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'जर तुम्हाला एखाद्या अनोळखी नंबरवरून लग्नाच्या निमंत्रणाच्या स्वरूपात किंवा कोणत्याही फाईलच्या स्वरूपात मेसेज आला तर त्यावर क्लिक करू नका. फाइल डाऊनलोड करण्यापूर्वी समोरच्या व्यक्तीची ओळख पटवणे आवश्यत आहे.
महत्त्वाचे म्हणजे, अनेकदा लोक बदनामीच्या भितीने त्यांच्यासोबत घडलेला असा प्रकार इतरांना सांगताना घाबरतात. परंतु, असे न करता त्वरीत राष्ट्रीय हेल्पलाइन १९३० वर कॉल करा किंवा सरकारी पोर्टल https://cybercrime.gov.in. वर जाऊन आपली तक्रार नोंदवावी.
तरीही तुम्ही सायबर फसवणुकीला बळी पडत असाल तर तात्काळ नॅशनल सायबर हेल्पलाईन १९३० वर संपर्क साधा किंवा https://cybercrime.gov.in जाऊन आपली तक्रार नोंदवा.