४ जुलै रोजी ब्रिटिश मतदारांनी कीर स्टार्मर यांच्या नेतृत्वाखालील लेबर पार्टीच्या बाजूने प्रचंड बहुमत देऊन आपला निर्णय दिला. अशाप्रकारे ब्रिटनमध्ये गेले १४ वर्ष असलेली कंझर्व्हेटिव्ह पार्टीची राजवट संपली. २०१० च्या निवडणुकीत मतदारांनी कंझर्व्हेटिव्ह पार्टीला कौल दिला होता. तेव्हापासून ते ब्रिटनमध्ये सतत सत्तेत विराजमान होते. ब्रिटिश इतिहासात यापूर्वी लेबर पार्टीच्या अशा महाविजयाची (Landslide victory)ची नोंद फक्त तीन वेळा, १९४५ मध्ये क्लेमेंट ॲटलीच्या नेतृत्वाखाली, १९९७ मध्ये टोनी ब्लेअरच्या नेतृत्वाखाली आणि आता कीर स्टार्मरच्या नेतृत्वाखाली झाली आहे. एखाद्या राजकीय पक्षाने संसदेच्या कनिष्ठ सभागृहातील ६५० जागांपैकी ४०० जागा जिंकलेल्या असतात तेव्हाच ‘महाविजय’ हा शब्द वापरता जातो. कंझर्व्हेटिव्ह पार्टीतील टोकाची भांडणे, पक्षात ‘मध्यम-उजवे' ते अत्यंत कडवे यांच्यात फूट पडणे हे कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या पतनाचे मुख्य कारण होते. कंझर्व्हेटिव्ह पार्टीच्या अंतहीन राजकीय सोप ऑपेराचा परिणाम असं ग्रँट शॅप्सने या पराभवाचे अचूक वर्णन केलं आहे.
ब्रिटनमध्ये कंझर्व्हेटिव्ह पार्टीचं जवळपास संपूर्ण नेतृत्वच पराभूत झाले असून कंझर्व्हेटिव्ह पार्टीच्या प्रमुख मंत्र्यांना त्यांची जागा राखता आलेली नाही, यातूनच पराभवाची व्याप्ती स्पष्ट होते. या निवडणुकीत विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री मिशेल डोनेलन, वेल्स खात्याचे मंत्री डेव्हिड टीसी डेव्हिस, हाऊस ऑफ कॉमन्सचे नेते पेनी मॉर्डाउंट, संरक्षण मंत्री ग्रँट शॅप्स, सांस्कृतिक खात्याचे मंत्री लुसी फ्रेझर, न्यायमंत्री ॲलेक्स चाक, शिक्षण मंत्री गिलियन कीगन, वाहतूक मंत्री मार्क हार्पर या कंझर्व्हेटिव्ह पार्टीच्या मंत्र्यांना पराभवाची धूळ चाखावी लागली आहे.
ब्रिटनच्या माजी पंतप्रधान लिझ ट्रस, ज्या २०१९ च्या निवडणुकीत २६,१९५ मतांनी निवडून आल्या होत्या, त्यांना लेबर पार्टीचे उमेदवार टेरी जर्मी यांनी ६३० मतांनी पराभूत केले आहे. बहुतेक कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे उमेदवार हे फारच कमी मतांच्या फरकाने निवडून आल्याचे दिसून येते. माजी अर्थमंत्री जेरेमी हंट ८९१ मतांनी निवडून आले तर कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे अध्यक्ष रिचर्ड होल्डन केवळ २० मतांनी विजयी झाले आहेत. त्याचप्रमाणे व्यवसाय आणि व्यापार खात्याचे मंत्री केमी बेडोनोच यांचं मताधिक्य २७५९४ मतांवरून २६१० एवढं घसरलं आहे. गेल्या १८ महिन्यांहून अधिक काळात करण्यात आलेल्या विविध सर्वेक्षणात लोकप्रियतेत लेबर पार्टी हा कंझर्व्हेटिव्ह पार्टीच्या २०% पुढे असल्याचे दिसून आले होते. विशेष म्हणजे निवडणुकीच्या निकालांमध्ये हे भाकीत खरे ठरले आहे.
ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांनी २३ मे २०२४ रोजी थोड्या हताशपणेच निवडणुकीची घोषणा केली होती. निवडणुकीला सामोरे जाताना सत्ताधारी कंझर्व्हेटिव्ह पक्षाकडे जनतेला सांगण्यासारखी एकमेव चांगली बातमी म्हणजे महागाईचा दर ११ % वरून २% पर्यंत खाली आणण्याची त्यांनी केलेली चमकदार कामगिरी होती. परंतु माजी पंतप्रधान लिझ ट्रस यांनी त्यांच्या ४५ दिवसांच्या राजवटीत तयार केलेल्या आर्थिक धोरणांमुळे विक्रमी चलनवाढ आणि व्याजदरवाढ निर्माण झाली होती. ती कायम होती. त्यामुळे गृहकर्जेही महागले होते.
१९४५ पासून ते २०२४ पर्यंत कंझर्व्हेटिव्ह सरकारांनी दोन तृतीयांशपेक्षा जास्त काळ ग्रेट ब्रिटनवर राज्य केले आहे, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. कंझर्व्हेटिव्ह पार्टीचे नेते हे लेबर पार्टीच्या नेत्यांपेक्षा आर्थिक परिस्थिती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊन हाताळतात, अशी ब्रिटिश मतदारांची सामान्य धारणा आहे. कोविड महामारी तसेच युक्रेन आणि गाझामधील मोठ्या युद्धांसारख्या बाह्य कारणांमुळे उद्भवलेल्या असाधारण काळात ब्रिटीश मतदार लेबर पार्टीच्या नेतृत्वाकडे आशेने पाहत होते. १९४५ आणि १९९७ मध्ये, लेबर पार्टीने त्यांची समाजवाद धोरणे राबवून चांगली कामगिरी करून ब्रिटनला विकास आणि स्थिरता प्रदान केले होते. ‘कीर स्टार्मरचा लेबर पक्ष आता अत्यंत जागरुक अशा ब्रिटीश मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करू शकेल का?’ हा कळीचा प्रश्न आहे. राजकीय पक्षांदरम्यानच्या भांडणांमुळे देशाच्या हितास हानी पोहोचवू नयेत म्हणून ब्रिटीश मतदार नेत्यांना माफ करण्यास तयार आहे. तथापि, जेव्हा ब्रिटीश मतदारांना असे वाटते की देशहिताला हानी पोहोचते आहे तेव्हाच ते व्यक्त होतात, नव्हे ते स्पष्टपणे व्यक्त होतात.
-कोविड महामारीमुळे उद्भवलेल्या आर्थिक समस्येतून बाहेर येण्यासाठी देशाला सुमारे ४५० अब्ज पौंड इतका खर्च येणार आहे. युरोपियन युनियनमधून ‘ब्रेक्झिट’चा परिणाम म्हणून देशाला किती मोठा आर्थिक फटका बसला असेल हे अंदाज व्यक्त करणे कठीण आहे. ब्रेक्झिट ही राष्ट्रीय आपत्ती असूनही संपूर्ण अपयश म्हणून न स्वीकारता त्यातून काही फायदा करून घेणे शक्य होईल का? आर्थिक मंदीतून बाहेर पडून आर्थिक विकास साधता येईल का?
-मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी इमिग्रेशनवर (कायदेशीर आणि बेकायदेशीर) नियंत्रण ठेवून त्याचे व्यवस्थापन करता येऊ शकेल का?
-ब्रिटीश लेबर पार्टीने निर्माण केलेली ब्रिटीश नागरिकांसाठीची सर्वात मोठी योजना राष्ट्रीय आरोग्य सेवा (National Health Service) वाचवता येईल का?
-विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये जगाला नेतृत्व प्रदान करण्यासाठी यूके देशातील प्रसिद्ध विद्यापीठांवर अवलंबून आहे का?
-आर्थिक संकटामुळे निर्माण झालेल्या कायदा आणि सुव्यवस्थेसारख्या इतर समस्यांवर नियंत्रण ठेवता येईल का?
-बदलत्या आंतरराष्ट्रीय राजकीय परिस्थितीत ब्रिटन एक महान राष्ट्र बनू शकेल आणि जगाला खरे नैतिक नेतृत्व देऊ शकेल का?
मावळते कंझर्व्हेटिव्ह पार्टीचे सरकार या समस्यांचे निराकरण करण्यात अयशस्वी ठरले होते. त्यामुळे ब्रिटिश मतदार यापैकी बहुतेक समस्यांचे निराकरण करण्यासाठी लेबर पार्टीच्या नेतृत्वाकडे पहात आहेत.
लेबर पार्टीचे नेते कीर स्टार्मर यांनी आतापर्यंत व्यावहारिक असे नेतृत्व दिले आहे. लेबर पार्टीचे पूर्वीचे नेते जेरेमी कॉर्बिन यांच्या संकुचित कम्युनिस्ट दृष्टिमुळे निर्माण झालेल्या अनेक अंतर्गत समस्यांचे निराकरण त्यांनी केले आहे. लेबर पार्टीचे नेते कीर स्टार्मर हे यापुढे ब्रिटीश नागरिकांची मनं कशी जिंकतात आणि लेबर पार्टीचे संस्थापक केयर हार्डी यांच्या मूल्यांवर आधारित लेबर पार्टीची धुरा कशी सांभाळतात, हे येणारा काळच सांगेल.
(दिलीप आमडेकर हे लंडनमध्ये राहतात. ते लेबर पार्टीचे सदस्य असून त्यांनी यूके आणि भारतातील राजकीय संशोधनात योगदान दिले आहे)