Jawan dialogue and Arvind Kejriwal Speech : प्रदर्शनाच्या आधीपासूनच बॉलिवूड व सिनेरसिकांमध्ये जोरदार हवा निर्माण करणारा शाहरुख खानचा 'जवान' हा चित्रपट प्रदर्शनानंतरही चर्चेत आहे. पहिल्याच दिवशी 'जवान'नं शाहरुखच्याच 'पठान' सिनेमाचा कमाईचा विक्रम मोडला आहे. या चित्रपटातील डायलॉगची सध्या चर्चा आहे. यातील एका राजकीय डायलॉगकडं बोट दाखवत आम आदमी पक्षानं (Aam Aadmi Party) ट्वीट केलं आहे. 'शाहरुख खान जे 'जवान'मध्ये बोललाय, ते अरविंद केजरीवाल अनेक वर्षांपासून बोलत आहेत, असा दावा 'आप'नं केला आहे. पुरावा म्हणून 'आप'नं अरविंद केजरीवाल यांच्या जुन्या भाषणाचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे.
शाहरुख खानचा 'जवान' हा सिनेमा बॉलिवूडमधील टिपिकल मसालापट आहे. यात अॅक्शन, रोमान्स आणि हमखास टाळ्या मिळवू शकणारे डायलॉग आहेत. शाहरुख खानच्या तोंडी हे संवाद असल्यानं चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये एक वेगळीच क्रेझ निर्माण झाली आहे. सामान्य जनतेला उद्देशून शाहरुखनं म्हटलेला एक डायलॉग म्हणजे अरविंद केजरीवाल यांचीच भूमिका आहे. अरविंद केजरीवाल हे सर्वसामान्य जनतेशी गेली अनेक वर्षे अशाच पद्धतीनं संवाद साधत आहेत, असं 'आप'नं म्हटलं आहे.
जात, धर्म, पंथ, पैसा आणि भीतीपोटी मतदान करण्याऐवजी तुमचं मत मागायला येणाऱ्यांना हे प्रश्न विचारा...
त्यांना विचारा की माझ्यासाठी पुढच्या पाच वर्षांत काय करणार?
माझ्या घरातलं कुणी आजारी पडल्यास त्याच्या उपचारासाठी तुम्ही काय कराल?
मला रोजगार मिळवून देण्यासाठी तुम्ही काय कराल?
देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी तुम्ही काय कराल?
आम आदमी पक्षानं सोशल मीडियात शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये केजरीवाल हे देखील असंच काहीसं बोलताना दिसत आहेत. केजरीवाल म्हणतात, 'काही पक्ष धर्माच्या नावावर मतं मागतात, काही जातीच्या नावावर मतं मागतात... मी तुमच्यासाठी शाळा आणि रुग्णालयं बांधून देईन, असं सांगणारा एकही पक्ष मी आजवर पाहिला नाही. आम्ही इकडच्या-तिकडच्या गोष्टी बोलणार नाही. तुमच्या मुलांच्या कल्याणाबद्दल आणि तुमच्या भविष्याबद्दल बोलणार. मी तुमच्या मुलांना चांगलं शिक्षण देईन. सर्वांचे उपचार मोफत असतील. आरोग्य चाचण्या मोफत होतील. प्रत्येक बेरोजगारासाठी रोजगाराची सोय करणार आणि रोजगार मिळत नाही तोपर्यंत बेरोजगारी भत्ता देणार, असं केजरीवाल सांगत आहेत.
संबंधित बातम्या