Mahakumbh Stampede : मौनी अमावस्येनिमित्त बुधवारी पहाटे संगम परिसरात मोठ्या संख्येने भाविक स्नानासाठी दाखल झाल्यानंतर प्रयागराज महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीत ३० जण ठार तर ६० जण जखमी झाले. रात्री १ ते २ वाजेच्या दरम्यान आखाडा मार्गावर शेकडो भाविक आधीच उपस्थित राहून अमृतस्नानासाठी ब्रह्म मुहूर्ताची वाट पाहत असताना दुसऱ्या बाजूच्या जमावाने बॅरिकेड्स तोडून उड्या मारून पुढे जाण्यास सुरूवात केल्याने चेंगराचेंगरी झाली. वाटेत विश्रांती घेणाऱ्या भाविकांना जमावाने तुटवले गेले त्यांना उठून उभे राहायलाही वेळ मिळाला नाही.
प्रयागराजमधील संगम नोज हे ते ठिकाण आहे जिथे गंगा, यमुना आणि नामशेष झालेली सरस्वती नदी एकत्र येते. याला त्रिवेणी असेही म्हणतात. नावाप्रमाणेच त्याचा आकार नाकासारखा असतो. म्हणून या संगम क्षेत्राला संगम नाक म्हणतात. तो त्रिकोणी आहे. येथे उत्तर दिशेकडून गंगेचा अखंड प्रवाह वाहत आहे, तर दुसरीकडे दक्षिण दिशेकडून यमुनेचा प्रवाह गंगेत विलीन होताना दिसतो. दोन्ही नद्यांच्या पाण्याचा रंग संगमाच्या ठिकाणी वेगवेगळा असतो. गंगेचे पाणी हलके गढूळ दिसते, तर यमुनेचे पाणी हलके निळे दिसते. इथून यमुनेचा प्रवास संपतो आणि ती गंगेत विलीन होते.
४००० हेक्टरमध्ये पसरलेल्या आणि २५ सेक्टरमध्ये विभागलेल्या महाकुंभ संकुलातील गंगा आणि यमुनेच्या मिलन क्षेत्राला संगम बीच असेही म्हणतात. कुंभमेळ्यात अमृतस्नानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मौनी अमावस्येला संगम नाकावर अमृत स्नान केल्याने जन्म-पुनर्जन्माच्या चक्रातून मोक्ष आणि मुक्ती मिळते, असे मानले जाते. अशीही मान्यता आहे की, या दिवशी संगम नाकावर पाणी नसून अमृत वाहते. त्यामुळे त्या प्रसंगी तेथे स्नान केल्याने सर्व पापे धुतली जातात. याशिवाय मौनी अमावस्या ही पितरांना समर्पित असते, त्यामुळे आपल्या पूर्वजांच्या पूजेसाठी संगमाच्या तीरावर स्नान केले जाते.
संगमाच्या काठावरील दरडीमुळे दरवर्षी घाटाचे स्वरूप बदलते. तसेच हा एक घसगुंडीचा परिसर असून तेथे मोठ्या प्रमाणात वाळूच्या पिशव्या लावण्यात आल्या होत्या. जेणेकरून भाविकांना गंगेत पडणे टाळता येईल. यावेळी सरकारने संगम नोज बीचवर अतिरिक्त २००० हेक्टर क्षेत्रही वाढवले होते. असे असतानाही जागेची कमतरता भासत होती आणि एवढा भीषण अपघात घडला.
कुंभ, महाकुंभ, मकर संक्रांत, पौष पौर्णिमा, मौनी अमावस्या, शाही स्नान किंवा इतर पवित्र गंगास्नान या प्रसंगी संगम नोजवर गंगा स्नान करण्याची जुनी परंपरा आहे. त्यामुळे तेथील संगम नाकापर्यंत जाण्यासाठी आखाड्याचा मार्ग तयार करून बॅरिकेड्स लावले जातात. या मार्गावर सर्वसामान्य भाविकांना प्रवेश बंदी आहे. साधू-संत या मार्गावरून जाऊन अमृतस्नान करतात. सर्वसामान्यांच्या सोयीसाठी मेळा प्रशासनाने तेथे त्रिवेणी रस्ताही बांधला होता, मात्र मोठ्या गर्दीमुळे बॅरिकेड्स तोडून चेंगराचेंगरी झाली.
संबंधित बातम्या