Tahawwur Rana NIA Update : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेनंतर दुसऱ्याच दिवशी भारताच्या सुरक्षा यंत्रणेने २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या तहव्वुर राणाला भारतात आणण्याच्या तयारीत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) पथकाला सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे. राणाला भारतात आणण्यासाठी एक पथक तयार करण्यात आले असून ते केव्हाही अमेरिकेला जाऊ शकतं. या प्रक्रियेसाठी भारत सरकारने अमेरिकी प्रशासनाकडे कागदपत्रे सुपूर्द केली आहेत. 'सरेंडर वॉरंट' जारी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
एनआयएच्या तीन सदस्यीय पथकात महानिरीक्षक दर्जाचा एक अधिकारी आणि उपमहानिरीक्षक दर्जाचा अधिकारी असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. अमेरिकी अधिकाऱ्यांकडून 'सरेंडर वॉरंट' मिळाल्यानंतर ते अमेरिकेला रवाना होतील. संघातील सदस्य विमानतळावर तहव्वुर राणाचा ताबा घेतील आणि ताबडतोब भारतात परततील.
तहव्वुर राणा हा मूळचा पाकिस्तानी आहे. सध्या तो लॉस एंजेलिसच्या तुरुंगात आहे. लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडलीशी त्याचे संबंध आहेत. २००८ च्या मुंबई हल्ल्याचा तो मुख्य सूत्रधार होता. या हल्ल्यात १६६ जणांचा मृत्यू झाला होता.
प्रत्यार्पणाची प्रक्रिया वेगाने व्हावी यासाठी, यासाठी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने २१ जानेवारी रोजी राणाने दाखल केलेली पुनर्विचार याचिका पुन्हा फेटाळून लावली. त्यानंतर जानेवारीअखेर एनआयएचे पथक अमेरिकेत पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला होता, मात्र अमेरिकी अधिकाऱ्यांनी अतिरिक्त वेळ मागितला होता. भारत सरकारकडून यापूर्वीच अनेक आश्वासनांची पत्रे पाठविण्यात आली होती, परंतु अमेरिकी अधिकाऱ्यांनी कारागृहातील अतिरिक्त सुरक्षा आणि सुविधांबाबत अधिक माहिती मागितली होती.
अमेरिकेच्या प्रश्नांना भारतीय अधिकाऱ्यांनी उत्तरे दिली, अशी माहिती सूत्रांनी दिली. पोलिस कोठडीत अत्याचार, कायदेशीर मदत, सुरक्षा व्यवस्था आणि तिहार तुरुंगातील सुविधांची माहिती होती.
राणाच्या प्रत्यार्पणानंतर एनआयए दिल्लीतील मुख्यालयात त्याची चौकशी करेल आणि सुरक्षा व्यवस्था कडक केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. कडक बंदोबस्तात त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांच्या विभागात सुरक्षा मूल्यमापन सुरू केले आहे. राणा यांना हाय सिक्युरिटी वॉर्डमध्ये ठेवण्यात येणार असून, त्यांच्या हालचालींवर २४ तास लक्ष ठेवण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या