What is Amrit Bharat : भारतीय रेल्वेचं जाळं संपूर्ण देशभरात असून अनेक प्रकारच्या गाड्या रेल्वे प्रशासनाकडून चालवल्या जातात. देशातील प्रत्येक नवं सरकार प्रवाशांच्या सेवेत नवनव्या ट्रेन आणत असतं. 'वंदे भारत'नंतर आता अमृत भारत एक्सप्रेस ही नवी ट्रेन मोदी सरकारनं सुरू केली आहे. ३० डिसेंबर २०२३ रोजी पहिल्या अमृत भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.
अमृत भारत एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेच्या ताफ्यातील एक नवी 'लक्झरी' ट्रेन आहे. या ट्रेनमुळं सर्वसामान्यांचा प्रवास अधिक आरामदायी आणि वेगवान होणार आहे. तासाला १३० किलोमीटरचं अंतर कापण्याची क्षमता असलेली असलेली ही पूश-पूल ट्रेन आहे. कामाच्या निमित्तानं स्थलांतरित झालेल्या देशाच्या कानाकोपऱ्यात स्थलांतरित झालेल्या कामगारांना या ट्रेनचा मोठा फायदा होणार आहे.
अमृत भारत एक्स्प्रेस हे 'वंदे साधारण' या गाडीचा अद्ययावत अवतार आहे. अमृत भारत गाड्यांची निर्मिती चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये (ICF) करण्यात आली आहे. नवीन अमृत भारत एक्सप्रेस ट्रेनचा केशरी आणि राखाडी रंग लक्षवेधी आहे. ट्रेनच्या 'पूश-पूल' ऑपरेशनच्या मदतीसाठी ट्रेनच्या प्रत्येक टोकाला ६,००० हॉर्सपावरसह WAP5 लोकोमोटिव्ह आहे. वेगाला चालना देणं हा पूश-पूल ट्रेनचा सर्वात मोठा फायदा आहे. त्यामुळं प्रवासाचा वेळ कमी होतो.
अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांमध्ये २२ नॉन एसी डबे आहेत. यात अनारक्षित प्रवाशांसाठी ८ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे, १२ द्वितीय श्रेणीचे त्रिस्तरीय स्लीपर कोच आणि दोन गार्ड डबे आहेत. दिव्यांग प्रवासी आणि महिलांसाठी विशेष जागा आहे.
ताशी कमाल १३० किमी वेगाला परवानगी
प्रवासात आचके बसू नयेत म्हणून विशिष्ट प्रकारच्या कपरर्सची सुविधा
झिरो डिस्चार्ज एफआरपी मॉड्युलर टॉयलेट
वेग पकडण्याचा वेळ अत्यंत कमी. त्यामुळं प्रवासाच्या वेळेत बचत
पुश-पुल कॉन्फिगरेशनमध्ये (केंद्रित पॉवर ट्रेन सेट) दोन्ही टोकांना एरोडायनॅमिकली डिझाइन केलेले WAP5 लोकोमोटिव्ह
सामान ठेवण्यासाठी अद्ययावत करण्यात आलेला गुबगुबीत रॅक
जेवणासाठी हलक्या वजनाचे फोल्डेबल टेबल
मोबाइल चार्जरसाठी योग्य होल्डर आणि बॉटल ठेवण्यासाठी फोल्डेबल होल्डर
नव्या रंगसंगतीसह डोळ्याला सुखावणारे व वापरायोग्य डिझाइन असलेले सीट आणि बर्थ
टॉयलेट आणि इलेक्ट्रिकल क्यूबिकल्समध्ये एरोसोल आधारित फायर सप्रेशन सिस्टम
पूर्णपणे सीलबंद गँगवे
रेडियम लाइट असलेली फ्लोअरिंग पट्टी
ट्रेनच्या दोन्ही टोकांना लोकोसह पूश-पूल ऑपरेशनसाठी शेवटच्या भिंतींवर कपलर नियंत्रक