मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  भारतीय लष्कराच्या 'अग्निपथ' योजनेला इतका विरोध का होतोय?

भारतीय लष्कराच्या 'अग्निपथ' योजनेला इतका विरोध का होतोय?

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Jun 16, 2022 12:14 PM IST

लष्करात भरतीसाठी केंद्र सरकारने घोषित केलेल्या अग्निपथ योजनेला देशभरात तरुणांकडून विरोध केला जातोय. काय आहे योजना? का होतोय विरोध?

केंद्र सरकारने शॉर्ट टर्मसाठी अग्निपथ योजनेची घोषणा केली आहे.
केंद्र सरकारने शॉर्ट टर्मसाठी अग्निपथ योजनेची घोषणा केली आहे. (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

केंद्र सरकारने नुकतीच भारती लष्करात (Indian Army) भरतीसाठी अग्निपथ भरती योजनेची (Agneepath Scheme) घोषणा केली. तरुणांना ४ वर्षांसाठी लष्करात सेवेची संधी देणाऱ्या या योजनेनंतर देशातील भरतीची तयारी करणारे उमेदवार अनेक ठिकाणी विरोध करत आहेत. बिहार, राजस्थानमध्ये तर उमेदवार रस्त्यावर उतरले असून काही ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. केंद्र सरकारच्या या लष्कर भरतीच्या योजनेचा विरोध तरुण का करतायत? ही योजना नेमकी काय आहे? या योजनेमुळे काय बदल होतील? या प्रश्नांची माहिती आपण घेऊ.

लष्कराच्या या योजनेच्या निषेधार्थ राजस्थानच्या तरुणांनी रस्त्यावर आंदोलन केलं आहे. काही ठिकाणी चक्का जाम आंदोलन केल्यानं वाहतूक ठप्प झालीय. आंदोलन करणाऱ्यांचे म्हणणे आहे की, बऱ्याच काळापासून लष्करात भरती न झाल्याने अनेक तरुण निराश आहेत. त्यातच आता असा प्रकारच्या योजनेमुळे सेवेसाठी मिळणारा काळ हा केवळ ४ वर्षांचा असेल. त्यामुळे तरुणांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. ही योजना केंद्र सरकारने मागे घ्यावी अशी मागणी तरुणांकडून केली जात आहे. देशात अशा पद्धतीने भरती केली गेली तर देशाच्या सुरक्षेचा खेळ होण्याची भीतीही तरुणांनी व्यक्त केलीय.

दोन वर्षांनी भरती काढली पण…
बिहारमधील तत्वीर सिंह नावाच्या उमेदवाराने म्हटलं की, दोन वर्षांपूर्वी वैद्यकीय आणि शारिरीक चाचणीत उत्तीर्ण झालो आहे. तरीही परीक्षा प्रलंबित आहे. दोन तीन वेळा हॉल तिकिट जारी झालं पण परीक्षा रद्द झाली. आता एवढं करून चार वर्षांसाठी सेवाकाळ करत आहेत. पेन्शन वगैरे सगळं बंद करतील असंही तत्वीरने म्हटलं आहे.

आसाममधील माइना हुसैन म्हणतो की, २०१९ च्या भरतीवेळी मी लष्करात दाखल होण्यासाठी प्रयत्न केले पण त्यात यश आलं नाही. पण मी तेव्हापासून प्रशिक्षण घेत आहे, सरावही करत आहे. आता अग्निपथ योजनेची घोषणा झाल्याचं ऐकलं आणि वाईट वाटलं. सरकारने दोन वर्षानंतर भरतीची घोषणा केली पण या योजनेत फक्त चार वर्षेच सेवा असेल अशी खंतही माइनाने व्यक्त केली.

चार वर्षानंतर करायचं काय?
लष्करात भरतीचं स्वप्न उराशी बाळगून त्याची तयारी करणाऱ्या तरुणांनी व्यथा मांडताना म्हटलं की, इतकी मुलं तयारी तर करत आहेत. पण भरती केली जात नाहीय. चारही बाजूने बंदी घालण्यात येत आहे. बेरोजगार तरुण रस्त्यावर नाही येणार तर कुठे जाणार असा प्रश्न रंजन तिवारी नावाच्या तरुणाने विचारला आहे. अग्निपथ योजनेतून लष्करात निवड झाली तर चार वर्षांनी मला निवृत्त व्हावं लागेल, त्यानंतर मी काय करायचं हा विचार करून चिंता वाटते अशा भावना उमेदवारांनी व्यक्त केल्या आहेत.

देशातील काही नेत्यांनीसुद्धा केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेचा विरोध केला आहे. यामध्ये आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी विरोध करताना म्हटलं की, देशात सर्वाधिक भरती होत असलेल्या भारतीय रेल्वे आणि भारतीय लष्करातही नोकऱ्या कंत्राटी पद्धतीने होऊ लागल्या तर शिकलेल्या तरुणांनी काय करायचं? तरुणांनी शिक्षण आणि चार वर्षांची कंत्राटी नोकरी ही भविष्यात भाजप सरकारच्या उद्योगपती मित्रांच्या कंपन्यांची सुरक्षा करण्यासाठी करायची का? असे प्रश्न तेजस्वी यादव यांनी विचारले.

काय आहे नेमकी योजना?
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या या योजनेंतर्गत १७.५ ते २१ वर्षांच्या वयोगटातील तरुणांना चार वर्षांसाठी लष्करात सेवेची संधी मिळेल. चार वर्षांचा कालावधी संपल्यानंतर यातील २५ टक्के तरुणांचा सेवाकाळ वाढवण्यात येईल. यासाठी शैक्षणिक पात्रता १० किंवा १२ वी पास असणार आहे. तसंच ही भरती ४ वर्षांच्या कालावधीसाठी असेल. यामध्ये पहिल्या वर्षी मिळणारे वेतन ३० हजार रुपये प्रति महिना असेल तर चौथ्या वर्षी ४० हजार रुपयांपर्यंत प्रति महिना वेतन दिले जाईल. चार वर्षांच्या सेवाकाळातील कामगिरीच्या आधारे मूल्यांकन होऊन २५ टक्के उमेदवारांना नियमित केलं जाणार आहे. योजनेची घोषणा करताना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी असेही सांगितले की, यामुळे लष्कराचे सरासरी वय ३२ वरून २६ ते २४ वर्षापर्यंत कमी होईल.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या