israel smart bomb : लेबनॉनमध्ये हाहाकार माजवणारा इस्रायलचा स्मार्ट बॉम्ब नेमका आहे कसा? क्षणात होते इमारत जमीनदोस्त
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  israel smart bomb : लेबनॉनमध्ये हाहाकार माजवणारा इस्रायलचा स्मार्ट बॉम्ब नेमका आहे कसा? क्षणात होते इमारत जमीनदोस्त

israel smart bomb : लेबनॉनमध्ये हाहाकार माजवणारा इस्रायलचा स्मार्ट बॉम्ब नेमका आहे कसा? क्षणात होते इमारत जमीनदोस्त

Published Oct 24, 2024 05:05 PM IST

Israel vs lebanon : हिजबुल्लाहचे कंबरडे मोडण्यासाठी इस्रायलनं अधिकच आक्रमक पवित्रा घेतला असून आता अत्यंत घातक अशा स्मार्ट बॉम्बचा वापर सुरू केला आहे.

smart bomb
smart bomb

Israel Smart Bomb : हमासचा प्रतिकार मोडून काढल्यानंतर आता इस्रायलनं लेबनॉनच्या दिशेनं मोर्चा वळवला आहे. गेल्या काही दिवसांपासून इस्रायल लेबनॉनमधील हिजबुल्लाह संघटनेचे म्होरके आणि तळांना लक्ष्य करत आहे. लेबनॉनची राजधानी बैरूत व इतर शहरांवर इस्रायलचे हल्ले सुरूच असून यासाठी आता नवनवी अस्त्रे वापरली जात आहेत. अलीकडंच इस्रायलनं हल्ल्यासाठी स्मार्ट बॉम्बचा वापर केल्याचं समोर आलं आहे.

या संदर्भातील एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात इस्रायलचा स्मार्ट बॉम्ब काही क्षणात एक बहुमजली इमारत उद्ध्वस्त करताना दिसत आहे. राखाडी रंगाचा बॉम्ब इमारतीवर आदळताना व्हिडिओत दिसत आहे.

वृत्तसंस्थेच्या कॅमेऱ्यानं टिपलेला राखाडी रंगाचा हा बॉम्ब इस्रायली शस्त्रागारातील सर्वात शक्तिशाली स्फोटकांपैकी एक असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. हा बॉम्ब टाकण्याच्या ४० मिनिटे आधी या दोन्ही इमारती रिकाम्या करण्याचा इशारा इस्रायलनं दिला होता. हिजबुल्लाहनं या इमारतींवर कब्जा केल्याचा दावा इस्रायलनं केला आहे.

स्मार्ट बॉम्ब म्हणजे काय?

इस्रायल लेबनॉनमध्ये हल्ले करण्यासाठी ज्या स्फोटकांचा वापर करत आहे, त्याला स्मार्ट बॉम्ब म्हटलं जात. इमारती उद्ध्वस्त करण्यासाठी याचा वापर होतो. हा गाइडेड बॉम्ब असून इस्रायलच्या एका जेटमधून तो डागण्यात आला होता, असं अभ्यासकांनी सांगितलं.

मानवाधिकार संघटनेचे शस्त्र संशोधक रिचर्ड फिन यांनी याबाबत अधिक माहिती दिली. त्यानुसार, हे अस्त्र दोन हजार पौंड वजनाचे असण्याची शक्यता आहे. स्पाइस नावाच्या इस्रायली बनावटीच्या गाइडेड किटने ते सुसज्ज आहे. स्पाइस ही इस्रायल सरकारच्या मालकीच्या राफेल अ‍ॅडव्हान्स्ड डिफेन्स सिस्टीमनं तयार केलेली स्मार्ट, अचूक, प्रभावी आणि स्वस्त प्रणाली आहे. एखाद्या बॉम्बला किंवा अस्त्रास त्याचं लक्ष्य गाठण्यासाठी या प्रणालीचा वापर केला जातो. ती जेव्हा बॉम्बला जोडली जाते तेव्हा ‘स्मार्ट बॉम्ब’ म्हणून ओळखली जाते. 

घटनास्थळी उपस्थित असलेल्या पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार, स्मार्ट बॉम्ब टाकण्याआधी संबंधित इमारतीवर दोन छोटे हल्ले करण्यात आले होते. इस्रायलचं सैन्य अनेकदा मोठा हल्ला करण्याआधी अशा प्रकारे इशारा देतं. तसा तो दिल्यानंतर झालेल्या हल्ल्यात काही क्षणातच संपूर्ण इमारत पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी बैरूतमध्ये वापरण्यात आलेल्या शस्त्रांबाबत भाष्य करण्यास नकार दिला.

कुठल्याही प्रकारच्या हवामानात कार्यक्षम

हा स्मार्ट बॉम्ब खराब हवामान आणि जीपीएसमुळं अडथळा असलेल्या भागात दिवस-रात्र काम करण्यास सक्षम आहे. या बॉम्बमध्ये अत्यंत घातक आणि अचूक हल्ला करण्याची क्षमता असते. त्यामुळं आजूबाजूच्या इमारती किंवा नागरिकांचं नुकसान होण्याची शक्यता कमी असते. लक्ष्यापासून ६० किलोमीटर अंतरावरूनही हा बॉम्ब सोडला जाऊ शकतो. त्यामुळं तो अधिकच धोकादायक ठरतो, असं बॉम्बच्या निर्मिती प्रक्रियेशी संबंधित असलेल्या कंपनीनं सांगितलं. हे बॉम्ब अमेरिकी बनावटीच्या एफ 15 आणि एफ 16 विमानांतून डागता येतात.

इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्ट्रॅटेजिक स्टडीजचे संरक्षण आणि लष्करी विश्लेषक जोसेफ डेम्पसी यांनी देखील इस्रायलनं लेबनॉनमध्ये टाकलेला बॉम्ब २००० पौंड वजनाचा स्पाइस बॉम्बच होता, असं म्हटलं आहे. हा गाइडेड बॉम्ब जीपीएस आणि इलेक्ट्रो-ऑप्टिकल गाईडन्स सिस्टम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रणालीवर अवलंबून असल्याचं मानले जाते. लक्ष्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी ही प्रणाली सेन्सर किंवा कॅमेरा वापरते.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर