General Knowledge: गुन्हेगारांकडून सत्य बाहेर काढण्यासाठी पोलिसांना विविध डावपेचांचा अवलंब करावा लागतो. गुन्हेगारांना सत्य बोलण्यास भाग पाडण्यासाठी कधी- कधी पोलीस थर्ड डिग्रीचाही वापर करतात. पण काही असे गुन्हेगार असतात, जे काहीही झाले तरी सत्य सांगण्यास नकार देतात. त्यावेळी पोलीस गुन्हेगारांची नार्को टेस्ट करू शकतात. अशा परिस्थितीत अनेकवेळा पोलीस न्यायालयाची परवानगी घेऊन गुन्हेगाराची नार्को टेस्ट घेतात, जेणेकरून खटला निकाली काढता येईल. पण ही नार्को टेस्ट म्हणजे काय आहे, नार्को टेस्ट केल्यानंतर गुन्हेगार सत्य कसे बोलतात? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
नार्को टेस्ट किंवा नार्को विश्लेषण ही अशी प्रक्रिया आहे, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला काही औषधे दिली जातात. ज्यामुळे ती व्यक्ती अर्धवट बेशुद्ध होते. नार्को टेस्टचा वापर पोलीस चौकशीदरम्यान सहकार्य न करणाऱ्या लोकांकडून लपविलेली माहिती काढण्यासाठी केला जातो. नार्को टेस्ट ही गुंतागुंतीची प्रकरणे सोडवण्यासाठी केला जातो, असा तज्ज्ञांचा दावा आहे. कोणत्याही आरोपीची नार्को टेस्ट करण्यापूर्वी पॉलीग्राफ टेस्ट करणे बंधनकारक आहे. या चाचणीला लाय डिटेक्टर टेस्ट असेही म्हणतात, ज्यामध्ये आरोपी खरे बोलतो की खोटे? हे मशीनच्या मदतीने जाणून घेतले जाते. या लेखात आपण नार्को टेस्ट म्हणजे काय आणि ती कशी केली जाते हे सविस्तर जाणून घेणार आहोत.
नार्को टेस्ट ही डिसेप्शन डिटेक्शन टेस्ट आहे, ज्यामध्ये पॉलीग्राफ आणि ब्रेन मॅपिंग टेस्ट देखील येतात. गुन्ह्याशी संबंधित सत्य शोधण्यासाठी नार्को टेस्टची मोठी मदत मिळते. ही चाचणी व्यक्तीला हिप्नोटिज्म अवस्थेत घेऊन जाते. त्यामुळे आरोपी विचार करून उत्तर देण्याच्या स्थितीत नसते. त्यामुळे तो जे काही खरे आहे, तेच सांगतो. नार्को टेस्टआधी व्यक्तीची फिटनेस चाचणी केली जाते. ज्यामध्ये फुफ्फुसाची चाचणी, हृदय चाचणी यांसारख्या प्री-ॲनेस्थेटिक टेस्ट केल्या आहेत. ही टेस्ट करताना भूलतज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आणि वैद्यकीय कर्मचारी तिथे उपस्थित असतात. सर्वात प्रथम आरोपीला भूल दिली जाते. त्यानंतर आरोपी हिप्नोटिज्म अवस्थेत गेल्यानंतर त्याला आवश्यक ती प्रश्न विचारली जातात.
नार्को टेस्टसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधाचा डोस आरोपीच्या वजनावर अवलंबून असते. प्रत्येक व्यक्तीसाठी डोस देण्याचे प्रमाण वेगळे असतात. डॉक्टर परिणामानुसार डोस वाढवू किंवा कमी करू शकतात. औषधे व्यक्तीला हिप्नोटिज्म अवस्थेत ठेवतात, ज्यामुळे तो जाणूनबुजून काहीही बोलू किंवा लपवू शकत नाही. संबंधित व्यक्ती एका वाक्यात उत्तर देतो.
२६/११ च्या मुंबई हल्ल्यातील सत्य उघड करण्यात नार्को टेस्टने महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र, आरुषी हत्याकांडात ही टेस्ट अपयशी ठरली. कारण नार्को टेस्ट न्यायालयात वैद्य मानली जात नाही. नार्को टेस्टमध्ये मिळालेल्या माहितीमुळे पुरावे गोळा करण्यास मदत झाली आणि ते पुरावे योग्य असल्यास न्यायलय पुढील निर्णय घेते.
संबंधित बातम्या