Kolkata Rape Case : कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेजमधील ट्रेनी डॉक्टर बलात्कार व खून प्रकरणी रोज धक्कादायक माहिती पुढे आली. डॉक्टरचा शवविच्छेदन अहवाल पुढे आला आहे. यात डॉक्टरांच्या गुप्तांगासह शरीरावर अनेक ठिकाणी गंभीर जखमांच्या खुणा असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच तिची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचं देखील नमूद करण्यात आलं आहे. या घटनेविरोधात देशभरात डॉक्टरांची निदर्शने सुरू आहेत.
अहवालानुसार, पीडितेच्या गुप्तांगात पांढरा चिकट द्रव पदार्थ आढळला आहे. तर तिला मारहाण केल्यामुळे मोठा रक्तस्त्राव व फुफ्फुसात रक्ताच्या गुठळ्या झाल्याचीही नोंद अहवालात आहे. तर फ्रॅक्चरच्या कोणत्याही खुणा आढळल्या नाहीत. तपासादरम्यान आढळून आलेले रक्त आणि इतर द्रवांचे नमुने पुढील तपासासाठी पाठवण्यात आले आहेत.
पोलिसांचे म्हणणे आहे की प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा मृतदेह ९ ऑगस्ट रोजी रुग्णालयाच्या सेमिनार रूममध्ये सापडला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी संजय रॉय नावाच्या व्यक्तीला अटक केली होती. नंतर त्याला केंद्रीय अन्वेषण ब्युरो सीबीआयकडे सोपवण्यात आले. या घटणेमुळे देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. जनक्षोभानंतर आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे माजी प्राचार्य डॉ. संदीप घोष यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला होता.
वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, आठ दिवसांपासून संपावर असलेल्या डॉक्टरांनी सोमवारी निर्माण भवनाबाहेर पर्यायी बाह्यरुग्ण सेवा (ओपीडी) देण्याचा निर्णय घेतला आहे. AIIMS च्या निवासी डॉक्टर्स असोसिएशन (RDA) च्या निवेदनानुसार, निवासी डॉक्टर सोमवारी निर्माण भवनाबाहेर जमले होते, ज्यात औषध, शस्त्रक्रिया, प्रसूती आणि स्त्रीरोग, बालरोग, नेत्ररोग आणि ऑर्थोपेडिक्स यासह सुमारे ३६ ओपिडी सेवा उपलब्ध असतील. मात्र, रुग्णालयातील आपत्कालीन सेवा पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहेत.
आंदोलनकर्त्या निवासी डॉक्टरांनी रविवारी रात्री उशिरा आपला संप सुरूच ठेवण्याची घोषणा केली. आरडीएच्या निवेदनानुसार, डॉक्टर सकाळी ११ वाजता निर्माण भवनसाठी रवाना होतील. सफदरजंग रुग्णालयाच्या निवासी डॉक्टरांनी सांगितले की, डॉक्टरांसाठी केंद्रीय सुरक्षा कायदा आणण्याबाबत सरकारकडून ठोस प्रतिसाद मिळाला असता तर काही दिलासा मिळू शकला असता.