Viral News : पश्चिम बंगालमधील एका सरकारी विद्यापीठातील वर्गात वधूच्या वेशात जात एका विद्यार्थ्याशी एका महिला प्राध्यापकाने 'लग्न' केलं. दोघांच्या या लग्नाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यावरून आता वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी विद्यापीठ प्रशासनाने बुधवारी चौकशीचे आदेश दिले आहेत. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. मात्र, आम्ही लग्न केलं नसून नाटक होतं. तसेच त्यांच्या विषयासंबंधी अभ्यासाचा भाग असल्याचा दावा देखील या प्राध्यापिकेने केला आहे.
हे प्रकरण पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यातील हरिनघाटा येथील मौलाना अबुल कलाम आझाद तंत्रज्ञान विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागातील आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओत वधूच्या वेशात प्राध्यापिका आणि प्रथम वर्षात शिक्षण घेणार विद्यार्थी वर्गात 'सिंदूर दान' आणि 'माला बादल' (पुष्पहार) यासह विविध हिंदू बंगालीपद्धतीने विवाह विधी करताना दिसत आहेत.
या व्हिडिओमुळे वाद निर्माण झाला आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने तीन सदस्यीय चौकशी समिती नेमून प्राध्यापिकेला स्पष्टीकरण मागितले आहे. हा एक 'सायको ड्रामा' असून तो आपल्या अभ्यासाचा भाग आहे. त्यात काहीही तथ्य नाही, असे प्राध्यापिकेने विद्यापीठातील अधिकाऱ्यांना सांगितले आहे.
हा व्हिडिओ केवळ अभ्यासाच्या दृष्टीने रेकॉर्ड करण्यात आला आहे. मानसशास्त्र विभागाची प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूने तो लीक करण्यात आल्याचा दावा प्राध्यापिकेने केला आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत प्राध्यापिकेला सक्तीच्या रजेवर पाठवलं असल्याची माहिती विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
विद्यापीठाचे कार्यवाहक कुलगुरू तापस चक्रवर्ती म्हणाले, 'प्राध्यापिकेने हा त्यांच्या विषयअभ्यासाचा भाग असल्याचे स्पष्ट केलं आहे. हा व्हिडिओत जे काही दिसत आहे ते खरं नसून प्रॅक्टिकलचा एक भाग आहे. इतर विभागातील तीन महिला प्राध्यापिकांची समिती या प्रकरणाची चौकशी करत असल्याचे त्यांनी सांगितले.
'इंडिया टुडे'शी बोलताना प्राध्यापिकेने सांगितले की, फेस पार्टीशी संबंधित एका प्रकल्पाच्या नियोजनाचा हा एक भाग होता. तो चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आला आहे. आपली प्रतिमा मलीन करण्यासाठी हा व्हिडिओ जाणीवपूर्वक लीक करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. हा व्हिडीओ ज्यांनी व्हायरल केला त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याचे देखील प्राध्यापिकेने म्हटलं आहे. हा व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आला आहे. फेसेस पार्टीसाठी आम्ही आखलेल्या प्रोजेक्टचा हा एक भाग होता. माझ्याविरोधातील षडयंत्राचा भाग म्हणून तो व्हायरल करण्यात आला. ज्यांनी माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांच्याविरोधात मी पोलिसांत तक्रार दाखल करणार आहे, असे व्हायरल व्हिडिओतील प्राध्यापिकेने म्हटलं आहे.
संबंधित बातम्या