Malda Crime: पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यातून धक्कादायक घटना उघडकीस आलीय. तिसऱ्यांदा मुलीला जन्म दिला म्हणून पत्नीला जबरदस्तीने कीटकनाशक पाजल्याची माहिती समोर आली. एवढेच नव्हेतर, पत्नीला कीटकनाशक पाजल्यानंतर पतीने पोटच्या नवजात मुलीलाही ठार मारण्याचा प्रयत्न केला. हे पाहताच इतर दोन मुलींनी धावत जाऊन त्यांच्या आजी- आजोबांना याबाबत माहिती दिली. पीडिताच्या वडिलांनी स्थानिक लोकांच्या मदतीने मुलीची आणि नवजात नातीची सुटका करत त्यांना स्थानिक आरोग्य केंद्रात नेले. सध्या दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. सोमवारी रात्री उशिरा ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने काही दिवसांपूर्वी नवजात मुलीला जन्म दिला. ज्यामुळे तिचा पती नाराज झाला. दरम्यान, तिसऱ्यांदा मुलीला जन्म दिल्याने पतीने सोमवारी पत्नीशी वाद घालायला सुरुवात केली. वाद विकोपाला गेल्याने पतीने जबरदस्तीने पीडित महिलेला किटकनाशक पाजले. त्यानंतर नवजात मुलीलाही किटकनाशक पाजण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच पीडिताच्या आई वडिलांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघींनाही स्थानिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र, पीडिताची प्रकृती खालवल्याने तिला मालदा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
याप्रकरणी पीडिताच्या वडिलांनी जावयाविरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. "माझ्या मुलीने तिसऱ्यांदा मुलीला जन्म दिल्याने जावयाकडून तिला सतत मारहाण होत असे. मात्र, सोमवारी जावयाने थेट माझ्या मुलीची हत्या करण्याचा प्रयत्न केला. माझ्या दोन नातवंडांनी आम्हाला वेळीच माहिती दिल्याने मोठी दुर्घटना टळली, अशी माहिती पीडितांच्या वडिलांनी पोलिसांत दिली.
याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी आरोपी पतीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. मात्र, आरोपीने त्याच्यावर लावलेले आरोप फेटाळून लावले. त्याच्या पत्नीचे एका व्यक्तीसोबत विवाहबाह्य संबंध होते. ज्यामुळे त्यांच्यात भांडण झाली आणि त्याच्या पत्नीने कीटकनाशक प्राशन केल्याचा पतीकडून आरोप करण्यात आलाय.