
नवी दिल्ली - देशाच्या उपराष्ट्रपती पदासाठी भाजपकडून जगदीप धनकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी शनिवारी झालेल्या भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर जगदीप धनकड यांच्या नावाची घोषणा केली. जगदीप धनकर सध्या पश्चिम बंगालचे (governor of West Bengal ) राज्यपाल म्हणून काम पाहत आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजप यांच्यात पश्चिम बंगालमध्ये संघर्ष पाहायला मिळतो, यामध्ये जगदीप धनकर यांनी मोठी भूमिका पार पाडली आहे. त्यांच्या याच कामगिरीचं त्यांना बक्षीस मिळाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
शेतकरी कुटूंबात जन्म -
जगदीप धनकर यांचा जन्म राजस्थानमधील एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचं सुरुवातीचं शालेय शिक्षण हे गावातच झालं. त्यानंतर सैनिक स्कूलमधून त्यांनी शिक्षण घेतलं. त्यांनी राजस्थान विद्यापीठातून फिजिक्सचं शिक्षण घेतलं. ते फर्स्ट जनरेशनचे वकील बनले. त्यांनी खूप कमी वेळात राजस्थान हायकोर्टात स्वत:ला प्रसिद्ध वकील म्हणून नाव कमावलं.
२०१९ पासून पश्चिम बंगालचे राज्यपाल -
धनकर यांनी जुलै २०१९ मध्ये पश्चिम बंगालच्या राज्यपाल पदाची सूत्र हाती घेतली होते. गेल्या तीन वर्षांच्या काळात धनकर आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात अनेक मुद्द्यांवरुन संघर्ष बघायला मिळाला आहे. त्यांच्या या संघर्षाची दखल भाजपच्या हायकमांडने घेतली आहे.
जाट आरक्षणामध्ये महत्वाची भूमिका -
जगदीप धनकर यांनी जनता दलमधून आपली राजकीय कारकिर्द सुरु केली. त्यांनी केंद्रीय मंत्री म्हणूनही काम पाहिले आहे. सुप्रीम कोर्टात ते वकील म्हणूनही कार्यरत होते. आता पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी त्यांच्यावर उप राष्ट्रपतीपदाची जबाबदारी सोपवली आहे. ७१ वर्षीय जगदीप धनकड हे राजस्थानमधील झुंझनुं जिल्ह्यातील किठाना येथील आहेत. राजस्थानमध्ये जाट समुदायाला आरक्षण मिळवून देण्यात त्यांचा मोठा हात आहे.
जनता दल ते भाजप व्हाया काँग्रेस असा राजकीय प्रवास -
जगदीप धनकर यांनी राज्यस्थान विद्यापीठातून वकिलीचं शिक्षण घेतले आहे. सुरुवातीला त्यांनी राज्यस्थानमधील हायकोर्टात वकिली केली. ते राजस्थानच्या बार काऊंसिलचे चेअरमनही राहिले आहेत. १९८९ मध्ये जगदीप धनकर झुंझनुंमधून खासदार म्हणून निवडून आले होते. चंद्रशेखर सरकारमध्ये त्यांनी मंत्री म्हणूनही काम पाहिले आहे. १९९१ मध्ये जगदीप धनकड यांनी जनता दलाचा राजीनामा देत काँग्रेसवाशी झाले होते. १९९३ मध्ये काँग्रेसने त्यांना अजमेरमधील किशनगढमधून आमदारकीचं तिकिट दिले होते. त्यांनी भाजपच्या जगजीत सिंह यांचा दीड हजार मतांनी पराभव केला होता. त्यानंतर काँग्रेसकडून त्यांनी खासदारकीची निवडणूकही लढवली, पण त्यामध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. २००३ मध्ये जगदीप धनकड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
जगदीप धनकर आणि ममता बॅनर्जी यांच्यातील वाद
पश्चिम बंगास विधानसभेची गेल्यावर्षी निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीदरम्यान राज्यपाल जगदीप धनकर आणि ममता बॅनर्जी यांच्यात टोकाचा संघर्ष बघायला मिळाला होता. तेव्हापासून वारंवार धनकर आणि ममता दीदी यांच्यात संघर्ष बघायला मिळतो. जगदीप धवकर यांनी फेब्रुवारी महिन्यात ममता सरकारचं अधिवेशनचं अनिश्चित काळासाठी स्थगित केलं होतं. राज्यपालांनी आदेश काढत विधानसभेचं अधिवेशन स्थगित केलं होतं. त्यावेळी ममता सरकार आणि राज्यपाल यांच्यात टोकाचा संघर्ष बघायला मिळाला होता. विशेष म्हणजे ममता यांच्याकडून राज्यपालांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. यासाठी त्यांनी 1996 सालाचे हवाला जैन प्रकरणाचे दाखले दिले होते.
उपराष्ट्रपतीपदासाठी ६ ऑगस्टला मतदान
भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती हे व्यंकय्या नायडू आहेत. त्यांचा कार्यकाळ १० ऑगस्ट २०२२ रोजी संपणार आहे. त्यांच्या कार्यकाळ संपण्याआधी उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक होणं आवश्यक आहे. त्यामुळे उपराष्ट्रपतीपदासाठी ६ ऑगस्टला मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार हे १९ जुलैपर्यत अर्ज दाखल करु शकतात. तर २० जुलैला उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. तसेच या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना २२ जुलैपर्यंत त्यांचा अर्ज मागे घेता येणार आहे. त्यानंतर ६ ऑगस्टला सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होईल. मतदानानंतर लगेच त्याचदिवशी मतमोजणी होऊन निकालही जाहीर होईल.
संबंधित बातम्या
