मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  'आम्ही सरकार फक्त सांभाळतोय, कसंतरी ७-८ महिने चालवायचंय' मंत्र्याच्या विधानाने खळबळ

'आम्ही सरकार फक्त सांभाळतोय, कसंतरी ७-८ महिने चालवायचंय' मंत्र्याच्या विधानाने खळबळ

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Aug 17, 2022 08:03 AM IST

Karnataka Politics: आपल्याच सरकारमधील मंत्र्याच्या अशा वक्तव्यानंतर सहकारी मंत्र्यांनी त्यांना धारेवर धरलं आहे. यानंतर विरोधी पक्ष असणाऱ्या काँग्रेसनेही खोचक टीका बोम्मई सरकारवर केली आहे.

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

Karnataka Politics: आम्ही सरकार चालवत नाहीय तर फक्त सांभाळत आहोत असं कर्नाटकचे कायदा मंत्री जेसी मधुस्वामी यांनी म्हटलं आहे. त्यांची कथित ऑडिओ क्लिप आता व्हायरल होत असून यात त्यांनी हे विधान केलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यावर आता यामुळे टीका केली जात आहे. गेल्या आठवड्यात राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरु होत्या. त्यातच अशा प्रकारचं वक्तव्य आल्यानं नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. बोम्मई यांनीही मंत्री मधुस्वामी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, "वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतला जात आहे. तसंच सगळं काही व्यवस्थित आहे, काहीही अडचण नाही."

मंत्री मधुस्वामी आणि चन्नापटनातील सामाजिक कार्यकर्ते भास्कर यांच्यात फोनवर चर्चा झाली होती. याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. यामध्ये भास्कर यांच्या शेतकऱ्यांसंबंधी तक्रारीवर बोलताना मधुस्वामी म्हणतात की, "आम्ही इथं सरकार चालवत नाहीय, आम्ही फक्त सरकार सांभाळत आहे. पुढचे ७-८ महिने कसंही करून ते चालवायचं आहे."

मधुस्वामी यांच्या वक्तव्यावर मंत्री मुनिरत्ना यांनी म्हटलं की मधुस्वामींनी असं वक्तव्य करण्याआधी तातडीने मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला हवा. सरकारचा ते एक भाग आहेत आणि मंत्रिमंडलाच्या प्रत्येक बैठकीत ते आहेत, त्यामुळे तेसुद्धा सरकारमध्ये आहेत. जबाबदारीच्या पदावर असताना असं वक्तव्य योग्य नाही, त्यांच्यासारख्या नेत्याला हे शोभनिय नाही अशा शब्दात मुनिरत्ना यांनी सुनावलं. तर सहकार मंत्री एसटी सोमशेखर यांनीही मधुस्वामी यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, "जर हे त्यांचे विचार असतील तर चुकीचे आहे."

आपल्याच सरकारमधील मंत्र्याच्या अशा वक्तव्यानंतर सहकारी मंत्र्यांनी त्यांना धारेवर धरलं आहे. यानंतर विरोधी पक्ष असणाऱ्या काँग्रेसनेही खोचक टीका बोम्मई सरकारवर केली आहे. काँग्रेसने बसवराज बोम्मई यांच्या सरकारवर टीका करत हे नाकारलेलं सरकार असल्याचं आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग