मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Weather Updates: कुठे हुडहुडी तर कुठे धुक्याची चादर? देशात पुढील पाच दिवस थंडीची लाट!

Weather Updates: कुठे हुडहुडी तर कुठे धुक्याची चादर? देशात पुढील पाच दिवस थंडीची लाट!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 17, 2024 08:30 AM IST

Cold Wave in India: भारतात कोणत्या भागात थंडी वाढली आणि कोणत्या ठिकाणी धुक्याची चादर पसरली, याबाबत जाणून घ्या.

Cold Wave in India
Cold Wave in India

India Weather Forecast: देशातील उत्तरेकडील राज्यांमध्ये तापमानात मोठी घट झाली आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढला आहे. देशात पुढील पाच दिवस थंडीची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे. दरम्यान, हवामान विभागाने अनेक राज्यांना थंडी आणि धुक्याचा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला.

CTA icon
तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उत्तर भारतात पुढील पाच दिवस दाट धुक्याची शक्यता आहे. दाट धुक्यामुळे दृष्यमानता कमी झाली. यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, प्रशासनाकडून वाहन घेऊन घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. दाट धुक्यामुळे देशाची राजधानी दिल्लीतील विमान उड्डाणे उशिराने सुरू आहेत. तर, दुसरीकडे रेल्वे वाहतूकही विस्कळीत झाली आहे. राजधानी एक्स्प्रेससारख्या गाड्याही १५ तासांहून अधिक उशिराने धावत आहेत.

पालम विमानतळावर सकाळी ७ वाजता १०० मीटर दृश्यमानता नोंदवण्यात आली. मात्र, त्यानंतर अर्ध्यातासाने दृष्यमानता ० मीटरवर घसरली. सफदरजंग विमानतळावर सकाळी ७ आणि ७.३० वाजता दृश्यमानता ५० मीटरपर्यंत नोंदवण्यात आली. दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्यामुळे गेल्या तीन दिवसांत दिल्ली विमानतळावर १००० हून अधिक उड्डाणे १२ तासांपेक्षा जास्त उशीराने धावत आहेत. यामुळे प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. दोन दिवसांपूर्वी दिल्ली- गोवा इंडिगो फ्लाइटला १० तासांपेक्षा जास्त उशीर झाल्यामुळे संतप्त प्रवाशाने वैमानिकाला धक्काबुक्की केली होती.

वायव्य भारतात पुढील चार ते पाच दिवसांत किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. याच कालावधीत पूर्व भारतात किमान तापमानात ३ ते ४ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. दिल्ली, पंजाब, हरियाणामध्ये काही ठिकाणी थंडीचा कडाका राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून आज पंजाब, हरयाणा चंदीगड-दिल्लीत तुरळक ठिकाणी दाट धुके, बिहारमध्ये तुरळक ठिकाणी दाट धुके आणि उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, झारखंड, उपहिमालयी पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये तुरळक ठिकाणी दाट धुके पडण्याची शक्यता आहे.

WhatsApp channel

विभाग