Temperature update today : देशात पुढील काही दिवस तापमानाचा पारा चढाच राहणार आहे. भारतीय हवामान विभागानं (IMD) देशातील अनेक राज्यांमध्ये २० एप्रिलपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. त्यामुळं नागरिकांनी काळजी घ्यावी आणि प्रवासाचं नियोजन सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत करावं, असं आवाहन करण्यात आलं आहे. एकीकडं उष्णतेच्या झळा बसत असताना देशातील काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाजही हवामान खात्यानं वर्तवला आहे.
हवामान खात्यानं आज म्हणजेच १७ एप्रिल रोजी कोकण, गोवा, सौराष्ट्र, कच्छमध्ये उष्णतेचा इशारा दिला आहे. आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवरील काही भागात १७ आणि १८ एप्रिलला, यानममध्ये, १६ ते २० एप्रिलदरम्यान ओडिशा आणि गंगेच्या पश्चिम बंगालमध्ये आणि १७ आणि १८ एप्रिलला तेलंगणात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, केरळ, माहे, रायलसीमा इथं १५ ते १८ एप्रिल दरम्यान उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
१८ ते २० एप्रिल दरम्यान पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधील काही भागांमध्ये मेघगर्जनेसह तुरळक पावसाची शक्यता आहे. आरडब्ल्यूएफसी दिल्लीनुसार, आज आणि उद्या म्हणजेच १८ एप्रिल रोजी अंशत: ढगाळ वातावरण आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच १९ एप्रिल रोजी, म्हणजेच शुक्रवारी वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयमध्ये १७ आणि १९ एप्रिल रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. १८ ते २१ एप्रिल दरम्यान केरळ, माहे येथे तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडेल आणि तामिळनाडू, पुद्दुचेरी-कराईकल, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि लक्षद्वीपमध्ये विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तविला आहे.
जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान, मुजफ्फराबाद, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये १८ ते २१ एप्रिल दरम्यान वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस वा बर्फवृष्टीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
हिमाचल प्रदेशात हवामान केंद्रानं शुक्रवारी म्हणजेच १९ एप्रिल रोजी काही ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने विजांच्या कडकडाटासह विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पश्चिम विक्षोभ गुरुवारपासून वायव्य भारतात धडकण्याची शक्यता असल्यानं हा इशारा देण्यात आला आहे. बुधवार वगळता २१ एप्रिलपर्यंत राज्यात ओल्या पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.
संबंधित बातम्या