Drishti IAS sealed : दृष्टी आयएएस कोचिंग सेंटरचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक विकास दिव्यकीर्ती यांनी जुने राजेंद्र नगर येथील एका कोचिंगच्या बेसमेंटमध्ये यूपीएससीच्या तीन उमेदवारांच्या दुर्दैवी मृत्यूप्रकरणी मौन सोडले आहे.
दृष्टी आयएएस स्टडी सर्कलच्या बेसमेंटमध्ये यूपीएससीच्या तीन उमेदवारांच्या मृत्यूनंतर दिल्ली महानगरपालिकेने नुकत्याच केलेल्या कारवाईत मुखर्जी नगरमधील विकास दिव्यकीर्तीचे दृष्टी आयएएस सील केले आहे. हे दिल्लीतील २९ कोचिंग सेंटरपैकी एक होते. महापालिकेच्या इमारत नियमांचे उल्लंघन करून काम केल्याच्या आरोपावरून महापालिकेने ही कारवाई केली.
एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत विकास दिव्यकीर्ती यांनी दिल्लीत परवानगी नसलेले काहीही करणार नाही आणि मंजूर इमारतींमध्येच काम करणार असल्याची ग्वाही दिली.
नुकतीच घडलेली घटना लक्षात घेता, हा निष्काळजीपणा होता याची मला पूर्ण जाणीव आहे. हे आमच्या मनात कधीच आलं नाही. भविष्यात परवानगी मिळाल्यास आम्ही तळघरात काम करणार नाही, असे मी तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून सांगत आहे, असे विकास दिव्यकीर्ती यांनी सांगितले.
फायर एक्झिट नसलेल्या अशा इमारती आम्ही भाड्याने घेत नाही, जेणेकरून कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही मुलाच्या किंवा कर्मचाऱ्याच्या जीवाला धोका निर्माण होणार नाही. हा आमचा हेतू आहे. मी समजून घेण्यात चूक केली; चूक झाली आणि भविष्यात त्या चुकीची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी मी संपूर्ण देशाची आणि संपूर्ण समाजाची माफी मागतो, असे दृष्टी आयएएस संस्थापक म्हणाले.
विकास दिव्यकीर्ती यांनी व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून इमारतीच्या सुरक्षिततेसाठी विभागीय मुख्य दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे.
"आम्ही दीड वर्षांपूर्वी विभागीय मुख्य दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक केली जी केवळ इमारतीच्या सुरक्षिततेची काळजी घेत होती. जानेवारी २०२३ मध्ये आम्ही एक व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला आणि मी त्याचा एक सदस्य आहे. दरवाजे उघडे आहेत का, फायर एक्झिट स्पष्ट आहे का, त्यावर कोणताही अडथळा नाही आणि छताचे दरवाजे उघडे आहेत की नाही, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत विद्यार्थ्यांना बाहेर काढता येईल, अशा १६ मुद्द्यांची तपासणी करणे हे त्या गटाचे काम आहे.
दिल्लीत कोचिंग सेंटर असलेल्या प्रत्येक इमारतीत किमान दोन एक्झिट आहेत, असा दावाही त्यांनी केला.
'हे १६ पॉईंट्स रोज तपासले जातात... जर तुम्ही सर्वेक्षण करून दिल्लीतील किंवा दिल्लीबाहेरील आमच्या कोणत्याही शाखेत जाऊ शकलात तर तुम्हाला संधी मिळावी अशी माझी इच्छा आहे; जर कोणत्याही इमारतीला किमान दोन एक्झिट नसतील तर त्याला मी जबाबदार आहे.
दिव्यकीर्ती यांनी दावा केला की त्यांनी सुरक्षेचे नियम तयार करण्यासाठी बरेच प्रयत्न केले आणि प्रत्येक कोचिंग सेंटरमध्ये फायर सेफ्टी एक्झिट आहे यावर भर दिला.
"मी तुम्हाला याबाबत आश्वस्त करत आहे. आणि नवी दिल्लीतील बेसमेंटमध्ये एकही कोचिंग इन्स्टिट्यूट चालणार नाही हे मला पाहायचे आहे. आणि जर तो बेसमेंटच्या वर चालत असेल तर त्याला फायर सेफ्टी एक्झिट असावा. मला अजून एक गोष्ट स्पष्ट करायची आहे. तुम्हाला वाटेल की मी मोठा दावा करत आहे. मी उघडपणे सांगत आहे की, इमारतीच्या सुरक्षेच्या निकषांच्या बाबतीत आम्ही ज्या प्रकारचे प्रयत्न केले, ते तुम्हाला कुठेही सापडणार नाहीत, याची मला खात्री आहे.
दिव्यकीर्ती यांनी यांनी म्हटले की, मला बळीचा बकरा बनवले गेले. यामुळे प्रशासनाला काही गोष्टी सोप्य होतात. मला निशाणा बनवले जात आहे, कारण अशा प्रकरणात कोणाला तरी बळीचा बकरा बनवावे लागते. आपल्या अपयशाचे खापर दुसऱ्याच्या माथ्यावर फोडता येते. इतकेच नाही तर समाजालाही वाटते त्यांना त्यांचा आरोपी मिळाला आहे. यावेळी विद्यार्थी भावनिक झाले आहेत. त्यामुळे ते माझ्यावर नाराज होणे स्वाभाविक आहे. ५० हून अधिक इंस्टीट्यूट सील करण्यात आले असून त्यामध्ये आमचेही आहे.
ते म्हणाले की, "हा माझा स्वभाव आहे, मी फारसा अभिव्यक्त होत नाही. तीन मुलांचा मृत्यू झाला आणि तो वेदनादायी मृत्यू होता. गेले तीन दिवस जेव्हा जेव्हा आपण घरी बोलतो किंवा मी झोपतो तेव्हा आत पाणी भरल्यावर त्या मुलांना काय भोगावे लागले असेल याची एक प्रतिमा मनात येते... सध्या आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी योग्य आहेत. आज तीन-चार विद्यार्थ्यांना भेटलो. दिल्लीच्या उपराज्यपालांसोबत माझी बैठक झाली. त्या सभेला काही विद्यार्थीही आले होते, तसेच अनेक संस्थांचे मालकही होते. डीडीए, एमसीडी, अग्निशमन विभाग आणि मुख्य सचिवयांच्यासह दिल्ली सरकारचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते, असे दिव्यकीर्ती यांनी मुलाखतीत सांगितले.
२७ जुलै रोजी सायंकाळी जुने राजिंदर नगर येथील कोचिंग इन्स्टिट्यूटच्या इमारतीच्या बेसमेंटमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने उत्तर प्रदेशातील श्रेया यादव, तेलंगणातील तान्या सोनी आणि केरळमधील नेविन डाल्विन या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.
एमसीडीने संस्थेचे तळघर सील केल्यानंतर सोमवारी सायंकाळी मुखर्जी नगर आणि जुने राजिंदर नगर येथील दृष्टी आयएएस कोचिंग सेंटरबाहेर शेकडो विद्यार्थ्यांनी निदर्शने केली.
दिव्यकीर्ती यांनीही माध्यमांनी परिस्थितीचे चित्रण केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. चॅनल्सना व्ह्यूज हवे आहेत आणि माझं नाव त्यांना आकर्षित करतं म्हणून माध्यमं संताप व्यक्त करत आहेत. माझं नाव लिहून माझ्यावर टीका केल्याने त्यांना जास्त व्ह्यूज मिळतात. त्यामुळेच माझं नाव अग्रस्थानी राहिलं आहे.
दिव्यकीर्ती यांनी ही परिस्थिती 'व्हर्च्युअल मॉब लिंचिंग'चा प्रकार असल्याचे सांगत सोशल मीडियावरील संतापाचे कारण त्याच चॅनल्सना दिले, ज्यांनी एकेकाळी प्रसिद्धी दिली.
संबंधित बातम्या