Supriya Sule: दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यासाठी भारत सरकार खासदारांचे शिष्टमंडळ परदेशात पाठवणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेशात जाऊन ऑपरेशन सिंदूरबाबत भारताची बाजू मांडण्यासाठी खासदारांच्या आठ समित्या स्थापन केल्या आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली. मलाही एका समितीत सामील होण्यास सांगण्यात आले आहे. देशाच्या प्रश्नावर आपण सर्व जण एकत्र आहोत, हे स्पष्ट आहे, असे त्या म्हणाल्या.
काल मला केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचा फोन आला. त्यांनी मला यापैकी एका समितीचा भाग होण्यास सांगितले आहे. जेव्हा आपल्या देशाचा प्रश्न येतो तेव्हा आपण सर्व जण एकत्र येतो, राजकीय भेद बाजूला सारतो आणि आपल्या देशाचा दृष्टिकोन मांडण्यासाठी इतर देशांमध्ये जातो, हे अगदी स्पष्ट आहे, असे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
सुळे यांच्या म्हणण्यानुसार, प्रत्येक समितीत सुमारे पाच सदस्य असतील, जे सुमारे १० दिवस विविध देशांना भेट देतील आणि भारताची बाजू मजबूत करतील. या सर्व समित्या २३ ते २४ मे दरम्यान निघण्याची शक्यता आहे.
एनआयच्या रिपोर्टनुसार, सरकार सुमारे ४० बहुपक्षीय खासदारांच्या सात गटांमध्ये जगातील विविध देशांचा दौरा करण्याची योजना आखत आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाला पाकिस्तानने पुरस्कृत आणि पोसलेल्या दहशतवादाची माहिती देणे आणि नुकत्याच झालेल्या ऑपरेशन सिंदूरची लक्ष्य आणि उद्दिष्टे अधोरेखित करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
हा दौरा २३ मे पासून सुरू होणार आहे. खासदारांचे गट अमेरिका, युनायटेड किंग्डम, संयुक्त अरब अमिराती, दक्षिण आफ्रिका आणि जपानसह जगातील अनेक प्रमुख राजधान्यांना भेट देऊ शकतात.
संबंधित बातम्या