Wayanad or Rae Bareli : लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्यावर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी कोपरखळी लगावली आहे. वायनाड आणि रायबरेलीमधून निवडणूक जिंकलेले आणि कोणती जागा रिकामी करायची या द्विधा मन:स्थितीत असलेले राहुल गांधी म्हणाले की, त्यांचा देव भारतातील गरीब जनता आहे आणि ते त्यांना काय करायचे ते सांगतील.
राहुल गांधी म्हणाले की, माझ्यासमोर एक द्विधा मनस्थिती आहे, मी वायनाडचा खासदार राहणार की रायबरेलीचा? दुर्दैवाने पंतप्रधानांप्रमाणे मला देवाचे मार्गदर्शन लाभलेले नाही. मी माणूस आहे,' असा टोला राहुल गांधी यांनी केरळमधील मलप्पुरम येथे लगावला.
गेल्या महिन्यात एका मुलाखतीत पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, देवाने मला क्षमता, सामर्थ्य, शुद्ध अंतःकरण आणि प्रेरणा देऊन पाठवले आहे. मी बायोलॉजिकल नाही तर देवानेच मला पाठवला आहे. माझी आई जिवंत असेपर्यंत मला वाटायचे की मी जैविकदृष्ट्या जन्माला आलो आहे. तिच्या निधनानंतर जेव्हा मी माझे अनुभव पाहतो, तेव्हा मला खात्री पटते की मला देवाने पाठवले आहे. ही शक्ती माझ्या शरीरातून नाही. ती मला देवाने दिली आहे. म्हणूनच देवाने ही मला हे करण्याची क्षमता, शक्ती, निर्मळ अंतःकरण आणि प्रेरणा दिली आहे. मी देवाने पाठवलेले साधन आहे, असे मोदी म्हणाले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परमात्म्यामुळे ते उद्योगपती गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांच्या बाजूने सर्व निर्णय घेतात, असे राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधी म्हणाले की, तुम्ही पाहिलं की पंतप्रधानांनी '४००-पार' म्हटलं ते गायब झालं आणि मग '३०० पार' आलं. त्यानंतर ते म्हणाले, 'मी बायोलॉजिकल नाही. मी कोणताही निर्णय घेत नाही. मला परमात्म्यांने या पृथ्वीवर पाठवलं आहे आणि तेच निर्णय घेतात.
त्यांच्या या विचित्र 'परमात्मा'मुळे ते अंबानी आणि अदानी यांच्या बाजूने सर्व निर्णय घेतात. मुंबई विमानतळ, लखनौ विमानतळ आणि वीज प्रकल्प अदानीला द्या आणि अग्निवीरसारख्या योजनांमध्ये त्यांना मदत करतात.
राहुल गांधी म्हणाले की, देवाकडून सूचना मिळविण्याची क्षमता माझ्याकडे नाही. माझ्यासाठी हे खूप सोपं आहे. माझा देव भारतातील गरीब जनता आहे, वायनाडची जनता आहे. मी जाऊन त्या लोकांशी बोलतो आणि माझा देव मला सांगतो की काय करावे.
राहुल गांधी रायबरेलीमधून ३,९०,०० मतांनी निवडून आले आहेत तर वायनाडमध्ये त्यांना ३ लाख ६४ हजार ४२२ च्या मताधिक्याने निवडून आले. २०१९ मध्ये राहुल गांधी अमेठीत पराभूत झाले होते, पण वायनाडमधून विजयी झाले होते.