भारतीय रेल्वेने गुरुवारी जम्मू-काश्मीरमधील चिनाब नदीवर बांधण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलावरून रेल्वेची यशस्वी चाचणी केली. रामबन जिल्ह्यातील सांगलदान ते रियासी दरम्यान हा पूल बांधण्यात आला आहे. लवकरच या मार्गावरील सेवा सुरू होईल, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, "यूएसबीआरएल प्रकल्पाच्या संगलदान - रियासी विभागादरम्यान मेमू ट्रेनची यशस्वी चाचणी घेण्यात आली. संपूर्ण यूएसबीआरएल - उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल लिंक - प्रकल्प वर्षाच्या अखेरीस पूर्ण होईल. सध्या कन्याकुमारी ते कटरा आणि काश्मीर खोऱ्यातील बारामुल्ला ते संगलदान पर्यंत गाड्या धावतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० फेब्रुवारी २०२४ रोजी यूएसबीआरएल प्रकल्पाच्या ४८.१ किमी लांबीच्या बनिहाल-सांगलदान विभागाचे उद्घाटन केले होते. ११८ किमी लांबीच्या काझीगुंड-बारामुल्ला विभागाचा समावेश असलेल्या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन ऑक्टोबर २००९ मध्ये करण्यात आले. त्यानंतर जून २०१३ मध्ये १८ किमी लांबीच्या बनिहाल-काझीगुंड आणि जुलै २०१४ मध्ये २५ किमी लांबीच्या उधमपूर-कटरा सेक्शनचे उद्घाटन करण्यात आले.
चिनाब रेल्वे पूल जम्मू-काश्मीर भागातील चिनाब नदीपासून ३५९ मीटर (सुमारे १०९ फूट) उंचीवर आहे. तो आयफेल टॉवरपेक्षा सुमारे ३५ मीटर अधिक उंच आहे.
१,३१५ मीटर लांबीचा हा पूल एका मोठ्या प्रकल्पाचा एक भाग आहे, ज्याचे उद्दीष्ट भारतीय रेल्वेची काश्मीर खोऱ्यात कनेक्टीव्हीटी वाढवणे आहे. उत्तर जम्मू-काश्मीरच्या डोंगराळ व खडतर भूभागामुळे या प्रकल्पाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. डिसेंबर २००४ मध्ये या प्रकल्पाला अधिकृत मान्यता मिळाली आणि मार्च २०२३ पर्यंत ट्रॅक टाकण्याचे काम पूर्ण झाले.
या ब्रीजचे डिझाइन आणि निर्माण भारतीय अभियंत्यांच्या कौशल्यतेचे प्रदर्शन नव्हे तर पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रही आहे. संगलदान ते रियासी दरम्यान पहिल्या ट्रेनला ३० जून २०२४ रोजी हिरवा झंडा दाखवला जाण्याची शक्यता आहे. हा पूल जम्मूतील रियासी जिल्ह्याला रेल्वे मार्गाने जोडला जाईल. चिनाब ब्रीज भारतीय रेल्वेच्या उधमपुर-श्रीनगर-बारामूला रेल लिंक प्रकल्पाचा एक भाग आहे. जो कश्मीर खोऱ्याला भारताच्या अन्य भागांना जोडण्यात महत्वाची भूमिका बजावणार आहे.
संबंधित बातम्या