Israel Iran war news : इस्त्रायली सैन्यानं इराणच्या लष्करी तळांवर केलेल्या हल्ल्यानंतर मध्य पूर्वेत भयंकर युद्ध भडकण्याची शक्यता आहे. इराणनं इस्रायलच्या हल्ल्याला तितकंच घातक उत्तर देण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळं संपूर्ण जगच टेन्शनमध्ये आलं आहे.
इस्रायलविरोधात लढणारी पॅलेस्टिनमधील हमास, लेबनॉनमधील हिजबुल्लाह या संघटनांना इराणचा उघड पाठिंबा आहे. त्यामुळं इस्रायल आणि इराणमध्ये वितुष्ट आहे. काही दिवसांपूर्वी इस्रायलनं हिजबुल्लाहच्या महत्त्वाच्या नेत्यांना ठार केलं होतं. तेव्हापासून इराण संतापला आहे. इराणनं १ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर एक क्षेपणास्त्र डागलं होतं. तेव्हाच इस्रायलनं प्रत्युत्तराचा इशारा दिला होता. त्यानुसार २५ दिवसांनी इस्रायलनं बदला घेतला. इराणच्या लष्करी तळांना लक्ष्य करत जोरदार हल्ला चढवला.
इस्त्रायली हल्ल्यानंतर इराणनं प्रतिहल्ल्याची तयारी सुरू केली आहे. पुढील सूचना येईपर्यंत इराणमधील सर्व मार्ग बंद केले गेले आहेत. तसंच विमान उड्डाणं देखील थांबवण्यात आली आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलला याची मोठी किंमत मोजावी लागण्याची शक्यता आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर इस्रायलमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.
इस्रायलनं केलेल्या हल्ल्याशी अमेरिकेचा काहीही संबंध नसल्याचं अमेरिकेनं स्पष्ट केलं आहे. तसंच, दोन्ही देशातील हल्ले आता थांबले पाहिजेत. इराणनं इस्रायलला प्रत्युत्तर देऊ नये असं अमेरिकेनं म्हटलं आहे. तसं झाल्यास इराणला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही दिला आहे. इराणनं इस्रायलवर प्रतिहल्ला केल्यास अमेरिका इस्रायलच्या बाजूनं युद्धात उतरण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या