लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहच्या सैनिकांच्या पेजरचा झालेल्या स्फोटानंतर बुधवारी पुन्हा एकदा स्फोटांची मालिका घडली. यावेळी वॉकीटॉकीला टार्गेट करण्यात आले असून या स्फोटात तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. सुरक्षा सूत्रांनी आणि एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, हिजबुल्लाहचे सैनिक वापरत असलेल्या वॉकीटॉकी आणि रेडिओ संचांचा बुधवारी दुपारी लेबनॉनच्या दक्षिण उपनगरात आणि बैरूतच्या दक्षिण भागात स्फोट झाले.
यातील एक स्फोट तर काल पेजर स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांचे अंत्यसंस्कार सुरू असताना झाला. अंत्यसंस्कार सुरू असतानाच वॉकीटॉकीचा स्फोट झाला. वॉकीटॉकीमध्ये झालेल्या स्फोटाचा व्हिडिओही समोर आला आहे. अंत्यसंस्काराच्या वेळी मोठी गर्दी झाली असताना अचानक स्फोट झाला. यानंतर चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण झाली. वॉकटॉकीमध्ये हा स्फोट झाला. पेजर्सप्रमाणेच ही उपकरणेही पाच महिन्यांपूर्वी खरेदी करण्यात आली होती.
एक दिवसापूर्वी लेबनॉनमध्ये अनेक ठिकाणी हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांनी वापरलेल्या पेजरचा अचानक स्फोट झाला होता. त्यात झालेल्या स्फोटामुळे सर्वत्र हाहाकार माजला होता. या हल्ल्यात १२ जणांचा मृत्यू झाला होता, तर २७०० हून अधिक लोक जखमी झाले होते. या हल्ल्यामागे इस्रायलचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, अद्याप इस्रायलने याची कबुली दिलेली नाही आणि इस्रायली लष्करानेही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
लेबनॉनच्या वरिष्ठ सुरक्षा सूत्रांनी सांगितले की, इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादने मंगळवारच्या बॉम्बस्फोटाच्या काही महिन्यांपूर्वी हिजबुल्लाहने खरेदी केलेल्या पेजरमध्ये स्फोटके ठेवली होती. लेबनॉनचे आरोग्यमंत्री फिरास अबियाद यांनी बुधवारी सांगितले की, मंगळवारी झालेल्या बॉम्बस्फोटातील मृतांची संख्या १२ वर पोहोचली असून त्यात दोन लहान मुलांचाही समावेश आहे. मंगळवारच्या हल्ल्यात सुमारे तीन हजार लोक जखमी झाले असून त्यात अतिरेकी संघटनेचे अनेक सैनिक आणि बैरूतमधील इराणचे राजदूत यांचा समावेश आहे. संयुक्त राष्ट्रांचे मानवाधिकार उच्चायुक्त व्होल्कर तुर्क यांनी पेजर स्फोटाच्या घटनांची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे.
ज्या पेजरमध्ये हे स्फोट झाले ते हंगेरीतील एका कंपनीने बनवले होते, असे सांगण्यात येत आहे. तैवानची कंपनी गोल्ड अपोलोने बुधवारी ही माहिती दिली. गोल्ड अपोलोने सांगितले की, हे पेजर बुडापेस्टस्थित आणखी एका कंपनीने तयार केले होते. ज्याने पेजरला आपला अधिकृत ब्रँड वापरण्याची परवानगी दिली होती. दुसरीकडे, पुरवठा करण्यापूर्वी या पेजरमध्ये स्फोटक साहित्य ठेवण्यात आल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. अमेरिकेच्या एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, मंगळवारच्या हल्ल्यानंतर इस्रायलने अमेरिकेला माहिती दिली. पेजरमध्ये थोड्या प्रमाणात स्फोटके लपवून ठेवली आणि नंतर स्फोट घडवून आणला.
पॅलेस्टिनी संघटना हमासने गेल्या वर्षी ८ ऑक्टोबरला इस्रायलवर हल्ला केल्यानंतर हिजबुल्लाह आणि इस्रायली सैन्यात दररोज चकमक सुरू आहे. लेबनॉनमधील या गोळीबार आणि हल्ल्यांमध्ये आतापर्यंत शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे, तर इस्रायलमध्येही डझनभर लोकांचा मृत्यू झाला आहे. संघर्षात सीमेच्या दोन्ही बाजूला हजारो लोक विस्थापित झाले आहेत. वेळोवेळी तणाव वाढला असला तरी दोन्ही बाजूंनी आतापर्यंत सावधपणे युद्ध टाळले आहे, परंतु इस्रायली नेत्यांनी अलीकडच्या आठवड्यात लेबनॉनमधील हिजबुल्लाहविरोधात कारवाई तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.