मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  IMD on Heatwave : गर्मीमुळं जीव वैतागलाय? भारतीय हवामान खात्यानं तुमच्यासाठी आणलीय खूशखबर

IMD on Heatwave : गर्मीमुळं जीव वैतागलाय? भारतीय हवामान खात्यानं तुमच्यासाठी आणलीय खूशखबर

May 29, 2024 03:30 PM IST

IMD on Heatwave : उकाड्यानं त्रस्त झालेल्या कोट्यवधी भारतीयांना भारतीय हवामानशास्त्र विभागानं खूषखबर दिली आहे. तापमानाचा पारा उद्यापासूनच खाली जाईल, असं हवामान विभागानं म्हटलं आहे.

गर्मीमुळं जीव वैतागलाय? भारतीय हवामान खात्यानं तुमच्यासाठी आणलीय खूशखबर
गर्मीमुळं जीव वैतागलाय? भारतीय हवामान खात्यानं तुमच्यासाठी आणलीय खूशखबर (HT)

IMD on Heatwave : भारतातील अनेक राज्यांत उष्णतेची लाट आल्यासारखी स्थिती असून उष्णतेची तीव्रता गुरुवारपासून कमी होण्याची शक्यता आहे. पुढील चार दिवसांत तापमानात हळूहळू आणखी घट होईल, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागानं वर्तवला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

आयएमडीचे शास्त्रज्ञ डॉ. नरेश कुमार यांनी आज 'एएनआय'ला ही माहिती दिली. पश्चिम हिमालयीन भागात दिसणाऱ्या पश्चिमी विक्षोभामुळे सध्याची उष्णतेसारखी परिस्थिती येत्या काही दिवसांत बदलण्याची शक्यता आहे. येत्या २४ तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे, असंही डॉ. कुमार यांनी सांगितलं.

आजही अनेक राज्यांमध्ये रेड अलर्ट

अनेक राज्यांमध्ये सध्या उष्णतेची लाट किंवा लाटेसदृश तापमान आहे. पश्चिम राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश इत्यादी भागात आजही तीव्र उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती कायम राहील. तिथं रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र उद्या, गुरुवारपासून उष्णतेच्या लाटेची तीव्रता कमी होण्यास सुरुवात होईल, असे डॉ. कुमार यांनी नमूद केले.

पंजाब, हरियाणा, हिमाचल, उत्तराखंडमध्ये पावसाची शक्यता

उद्यापासून तापमानात हळूहळू घट होण्यास सुरुवात होणार असल्यानं पंजाब, हरियाणा, पश्चिम हिमालयीन प्रदेशात पावसाच्या शक्यता आहे. मात्र, काही ठिकाणी तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता असल्यानं उन्हाळा पूर्ण संपण्यासाठी लोकांना आणखी प्रतीक्षा करावी लागेल. पश्चिमी विक्षोभ आणि अरबी समुद्रातून येणाऱ्या वाऱ्यांमुळं संपूर्ण भारतातील तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसनं घट होईल, असंही त्यांनी सांगितलं.

उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती म्हणजे काय?

जेव्हा एखाद्या प्रदेशाचं कमाल तापमान नेहमीच्या तापमानापेक्षा ४.५ अंश सेल्सिअस ते ६.४ अंश सेल्सिअस जास्त असतं, तेव्हा हवामान विभागाकडून उष्णतेची लाट घोषित केली जाते, तर कमाल तापमान नेहमीच्या तापमानापेक्षा ६.५ अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक असल्यास तीव्र उष्णतेची लाट घोषित केली जाते.

मुंबईचं तापमान ३४ अंशावर

मुंबईतील तापमान आज सरासरी ३४ अंस सेल्सिअस आहे. दिल्लीत मात्र उष्णता भयंकर आहे. तिथं मंगळवारी तापमान ४९.९ अंश सेल्सिअसवर पोहोचलं. नेहमीच्या तापमानापेक्षा ९ सेल्सिअसनं जास्त होतं. दिल्लीच्या मुंगेशपूर आणि नरेला परिसरातील स्थानिक हवामान केंद्रांद्वारे जवळपास ५० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. तीव्र उन्हामुळं दिल्ली सरकारनं पाणीपुरवठ्यावर निर्बंध घातले आहेत.

आशियातही उन्हाचे चटके

भारताच्या शेजारी पाकिस्तानसह संपूर्ण आशियातील कोट्यवधी लोक या वर्षी कडक उन्हाळा अनुभवत आहेत. आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांच्या मतानुसार, निसर्गातील मानवी हस्तक्षेपांमुळं हवामान बदल होत असून ही परिस्थिती आणखी बिघडू शकते.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग