us presidential election 2024 : भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेतली आहे. अमेरिकेत या वर्षाच्या शेवटी अध्यक्ष पदाच्या निवडणुका होत आहेत. दरम्यान, या पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्यावर टीका केली होती.
आयोवा येथील रिपब्लिकन कॉकसमधील खराब कामगिरीनंतर रामास्वामी यांनी हा निर्णय घेतला. या मतदानात माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले आहेत. बायोटेक उद्योजक असलेले रामास्वामी यांनी निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली. यावेळी ते म्हणाले, मी राष्ट्रपती होण्यासाठी कोणताही मार्ग नाही, त्यामुळे मी या निवडणुकीतून माघार घेत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाल्याने त्यांचे अभिनंदन करण्यासाठी फोन केला आहे. तसेच ट्रम्प यांना मी माझा पाठिंबा जाहीर केला आहे.
दरम्यान, यापूर्वी ट्रम्प यांनी रामास्वामी यांच्यावर जाहीर टीका केली होती. अध्यक्ष पदासाठी नामांकन मिळविण्यासाठी भारतीय-अमेरिकन उद्योजक असलेले रामास्वामी हे चुकीच्या डावपेचांचा अवलंब करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची ही टीका रामास्वामी यांच्या वक्तव्यानंतर व्हायरल झाली आहे. रामास्वामी यांच्या बोलण्याने ट्रम्प व त्यांचे सहकारी संतापले आहेत. रामास्वामी यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान काही लोकांनी घातलेल्या टी-शर्टवर लिहिलेल्या घोषणांमुळे ट्रम्प संतापले होते. टी-शर्टवर 'सेव्ह ट्रम्प, वोट विवेक' असे लिहिले होते. रामास्वामी यांनी शनिवारी आयोवा येथील रॉक रॅपिड्समधील कार्यक्रमानंतर तरुणांसोबतचा एक फोटो पोस्ट केला होता, ज्यामुळे माजी राष्ट्रपती ट्रम्प यांच्या राग आणखी वाढला.
रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळविण्यासाठी रामास्वामी हे ट्रम्प यांना कडवे आव्हान देऊ शकतात, असा विश्वास राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. पण आता परिस्थिती बदलली आहे. रिपोर्टनुसार, रामास्वामी आता अमेरिकेतील न्यू हॅम्पशायरमध्ये ट्रम्प यांच्यासोबत रॅलीही काढणार आहेत. रामास्वामी यांनी गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत सहभागी होण्याची घोषणा केली होती. तोपर्यंत त्यांना राजकीय वर्तुळात फार कमी लोक ओळखत होते. पण, त्यांनी इमिग्रेशन, अमेरिका-फर्स्ट असे मुद्दे जोरदारपणे मांडले. यामुळे रिपब्लिकन पक्षाच्या बाजूने नागरिकांचे मत तयार करण्यात त्यांना खूप मदत झाली.
संबंधित बातम्या