पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) ही देशाच्या तिन्ही सशस्त्रदलांसाठी शूर, निडर योद्धे तयार करणारी महत्वाची संस्था आहे. या मनाच्या संस्थेत आज दुर्मिळ योग पाहायला मिळाला. देशाच्या तिन्ही दलांचे विद्यमान प्रमुख आणि नुकतेच झालेले देशाचे दुसरे सीडीएस हे चौघेही प्रबोधिनीच्या १९७७ च्या तुकडीचे विद्यार्थी असून ते कोर्समेट देखील आहे. प्रबोधिनितील एकाच तुकडीचे विद्यार्थी हे सशस्त्र दलाचे प्रमुख होणे हा दुर्मिळ योग मानला जातो. या चौघांनीही आज राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीला भेट देऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच येथील हट ऑफ रिमेंमबरन्स येथे युद्धातील शहिदांना मानवंदना देखील वाहिली.
देशाचे दुसरे आणि नुकतीच निवड झालेले सीडीएस जनरल अनिल चौहान, लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे, नौदल प्रमुख ऍडमिरल आर. हरी कुमार, वायु दल प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी हे एकाच तुकडीचे विद्यार्थी आहेत. हे चौघेही कोर्समेट आहेत. या सर्वांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १९७७ तुकडीतून एकाच वेळी खडतर प्रशिक्षण घेऊन आपल्या सशस्त्र दलातील कारकिर्दीला सुरुवात केली होती. आज हे चौघेही देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान झाले आहेत. एकाच बॅच मधील विद्यार्थी हे तिन्ही दलाचे प्रमुख आणि सीडीएस देखील याच तुकडीचे असल्याने हा दुर्मिळ योग असून ही पहिलीच वेळ आहे. सीडीएस आणि तिन्ही दलांच्या प्रमुखांनी समन्वय सुधारणे आणि संयुक्तपणाला प्रोत्साहन देण्याच्या मुद्द्यांवर चर्चा केली.
या चौघांनीही येथील हट ऑफ रिमेंबरन्स येथे शहिदांना आदरांजली वाहिली. ज्यांनी देशसेवेसाठी सर्वोच्च बलिदान दिले. CDS चौहान यांनी NDA मधील प्रशिक्षणाचा आढावा घेतला. या सोबतच येथील सेवा सुविधांचा देखील त्यांनी आढावा घेतला. यानंतर त्यांनी येथील विद्यार्थ्यांशी देखील संवाद साधला.