गोव्याहून दिल्लीला निघालेले इंडिगो विमान मुंबईकडे वळवल्यानंतर संतप्त प्रवाशांनी मुंबई विमानतळावरच ठिय्या आंदोलन केले. १२ तास विलंब झालेल्या विमानातील प्रवाशांनी रात्रीचे जेवण करण्यासाठी रनवे वरच ठाम मांडले. त्यांनी रनवे वरून हटण्यास नकार देत विमान दिल्लीला नेण्याचा आग्रह धरला. ही घटना सोमवारी पहाटे घडली. खराब हवामानामुळे दिल्लीकडे जाणारी विमान सेवा विस्कळीत झाली होती. त्यामुळे हे विमान मुंबई विमानतळावर उतरवण्यात आले.
गोव्याहून 6E2195 निघालेले विमान मुंबईत उतरल्यानंतर प्रवाशांनी रनवे वरच विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी विमानासमोरच जेवण करण्यास सुरूवात केली. रात्री ११.४० वाजण्याच्या सुमारास विमानाला स्टेपलॅडर जोडण्यात आला व प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितले गेले. विमानतळ प्रशासनाने प्रवाशांच्या भोजनासाठी विशेष कोचची व्यवस्था केली होती. मात्र प्रवाशांनी जेवणाची पाकिटे घेऊन रन वे वरच ठाण मांडून रात्रीचे जेवण घेतले. त्यांनी विमान तत्काळ दिल्लीकडे नेण्याची मागणी केली.
इंडिगोच्या गोवा-दिल्ली विमानाला १२ तास विलंब झाल्यानंतर प्रवाशी मुंबई विमानतळावरच बसून रात्रीचे जेवण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. विमानतळ प्रशासनाने सांगितले की, दाट धुक्यामुळे टेक ऑफ व लँडिंग करण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे दिल्लीकडे जाणारी विमानसेवा विस्कळीत झाली आहे. सोमवारी ११० उड्डाणे विलंबाने तर ७९ उड्डाणे रद्द करण्यात आली आहे. सर्व विमाने सरासरी ५० मिनिटे विलंबाने लँडिंग होत आहेत.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ माजली आहे. इंडिगोचे गोवा-दिल्ली विमान रविवारी दुपारी २.२५ वाजता
टेक ऑफ करणार होते. मात्र याला विलंब झाला. त्यानंतर ते मुंबईकडे वळवण्यात आले. मुंबईतून ते पहाटे २.३९ वाजता दिल्लीकडे रवाना झाले.